कांद्याचे दर्जेदार उत्पादन कसे वाढवावे

कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील सौम्य हवामानामुळे कांद्याची लागवड जवळजवळ वर्षभर केली जाते. महाराष्ट्रात कांदा लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनाच्या बाबतीत नाशिक जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो.

हवामानातील चढउतार, रोगांचा वाढता प्रदुर्भाव, सुधारित तंत्रज्ञानाबाबत अज्ञान किंवा उदासीनता, सुधारित जातींचा कमी वापर, इत्यादी बाबींमुळे भारतात कांद्याची उत्पादकता कमी आहे. कांद्याच्या सुधारित जातींचा वापर करून शास्त्रीय पद्धतीने लागवड केल्यास कांद्याची उत्पादकता वाढविण्यास भरपूर वाव आहे.

कांद्याचे दर्जेदार उत्पादन कसे वाढवावे या लेखामध्ये आपणास कांद्याचे महत्त्व व गुणधर्म, कांद्याच्या विविध जातींची माहिती होईल. कांद्याच्या लागवडीचे तंत्र माहिती होईल. कांद्यावरील महत्त्वाच्या किडी आणि रोगांचे नियंत्रण करता येईल.

कांद्याचे महत्त्व व गुणधर्म

 • भारतीय लोकांच्या आहारात कांद्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. शाकाहारी तसेच मांसाहारी लोकांच्या आहारात कांद्याचा वापर दररोज केला जातो.
 • कोशिंबीर, चटणी आणि मसाला तसेच केचप आणि सॉस यांमध्ये कांद्याचा नेहमी वापर केला जातो.
 • कांद्याची पावडर करून आणि कांद्याचे उभे काप किंवा चकत्या करून ते वाळवून वर्षभर वापरता येतात.
 • कांद्यामध्ये ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट्स्, प्रोटीन्स तसेच फॉस्फरस, कॅल्शियम आणि लोह ही खनिजे असतात.
 • कांद्याला येणारा उग्र दर्प आणि तिखटपणा हा ‘अलिल प्रोपिल डायसल्फाईड’ या हवेत उडून जाणाऱ्या तेलकट पदार्थामुळे येतो. कांद्याचा लाल रंग हा ‘अँथोसायनीन’ या रंगद्रव्यामुळे येतो. तर पिवळ्या कांद्याचा रंग क्वेरसेटीन ह्या रंगद्रव्यामुळे येतो.
 • कांद्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. कांदा उत्तेजक, चेतनाप्रद असून त्यात गोड, आंबट, तिखट, कडवट आणि तुरट असे पाच निरनिराळे स्वाद आहेत. पित्त आणि वातशामक म्हणून कांद्याचा वापर केला जातो. थकवा, मरगळ, उष्माघात आणि रक्तवाहिन्यांतील दोष या विकारांवर कांदा अत्यंत गुणकारी आहे.

कांदा पिकासाठी हवामान कसे असावे ?

 • कांदा हे प्रामुख्याने थंड (हिवाळी) हंगामातील पीक आहे. महाराष्ट्रात कांद्याचे पीक खरीप आणि हिवाळी हंगामात घेतले जाते. नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांतील पश्चिम भागामध्ये कांद्याची उन्हाळी लागवड केली जाते.
 • कांद्याच्या उत्तम वाढीसाठी 15 ते 25 अंश सेल्सिअस तापमान आणि 70% आर्द्रता पोषक आहे. जास्त पाऊस आणि अतिदमट आणि ढगाळ हवामानामुळे कांद्याच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
 • कांद्याची वाढ आणि बीजोत्पादन हे तापमान अणि सूर्यप्रकाशाचा कालावधी (लहान आणि मोठा दिवस) यांवर अवलंबून असते. कांद्यामध्ये लहान दिवसांत वाढणाऱ्या (शॉर्ट डे) आणि मोठ्या दिवसांत वाढणाऱ्या (लाँग डे) अशा दोन प्रकारच्या जाती असतात. म्हणूनच खरीप आणि रब्बी हंगामात लागवडीसाठी वेगवेगळ्या जाती निवडणे आवश्यक असते.
 • लहान दिवसांत वाढणाऱ्या जाती मोठ्या दिवसांत चांगल्या प्रकारे वाढू शकतात; परंतु मोठ्या दिवसांत वाढणाऱ्या जाती लहान दिवसांत लावल्या तर त्यांची फक्त पालेवाढ होते आणि कांदे चांगले पोसत नाहीत.
 • दिवसाच्या लांबीइतकाच तापमानाचादेखील कांदा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे दिवसाची लांबी आणि तापमान यांचा एकत्रित विचार करून कांद्याला हवामान पोषक आहे किंवा नाही हे ठरवावे लागते.
 • कांदा पिकाच्या लागवडीनंतर गाठ थोडी मोठी होत असताना 12 ते 15 अंश सेल्सिअस, कांदा पोसत असताना 15 ते 20 अंश सेल्सिअस आणि कांदा काढणीच्या वेळी 25 ते 30 अंश सेल्सिअस असे तापमान कांद्याच्या वाढीला अनुकूल असते.
 • कांदे पोसण्याच्या कालावधीमध्ये म्हणजे लागवडीनंतर 30 ते 50 दिवसांत तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली बराच काळ राहिल्यास कांदा पोसण्याऐवजी त्यामधून डेंगळे येण्याची प्रवृत्ती वाढते.

कांदा लागवडीसाठी कोणती जमीन निवडावी ?

 • कांदा पिकासाठी हलक्या आणि मध्यम भारी जमिनी उपयुक्त ठरतात.पाण्याच्या उत्तम निचरा होणाऱ्या आणि सेंद्रिय पदार्थांचे भरपूर प्रमाण असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीत कांद्याचे पीक चांगले येते.
 • कांद्याच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू 6.5 ते 8.5 पर्यंत असावा. कांद्याची वाढ जमिनीच्या वरच्या थरात होत असल्याने आणि त्याची मुळे 24-30 सेंटिमीटर खोलीपर्यंत वाढतात म्हणून कांद्याच्या लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचा वरचा थर किमान 25 ते 30 सेंटिमीटरपर्यंत भुसभुशीत असावा.
 • कांद्याच्या मुळाभोवतीच्या जमिनीत भरपूर ओलावा आणि खेळती हवा असल्यास कांद्याची वाढ चांगली होते. यासाठी जमिनीच्या वरच्या थरात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण भरपूर असावे.
 • चोपण किंवा भारी काळ्या जमिनीत कांद्याची पालेवाढ जास्त प्रमाणात होते. मात्र कांदे त्या प्रमाणात पोसत नाहीत. याशिवाय चोपण किंवा काळ्या जमिनीत कांद्याचा आकार वेडावाकडा होतो.

कांदा लागवडीसाठी वाण कसे निवडावे ?

 • कांद्याच्या लागवडीसाठी जातीची निवड करताना त्या जातींमध्ये पुढील गुणधर्म असणे आवश्यक आहे. कांदा आकाराने गोलाकार असावा. बुडख्याचा किंवा मुळाचा भाग आत दबलेला नसावा.
 • कांद्याचा आकार मध्यम (जाडी 4.5 ते 6.5 सेंटिमीटर) असावा. जातीनुसार लाल, गुलाबी, विटकरी, पांढरा इत्यादी रंगांची चकाकी साठवणीत टिकून राहावी. कांद्याची मान बारीक असावी आणि आतील मांसल पापुद्रे एकमेकांना घट्ट चिकटलेले असावेत.
 • कांदा चवीला तिखट ते मध्यम तिखट असावा; परंतु त्यास उग्र वास नसावा. अशा जातीची उत्पादनक्षमता हेक्टरी किमान 30 ते 35 टन असावी.
 • काढणीसाठी सर्व कांदे एकाच वेळी तयार व्हावेत आणि कांदा साठवणीत चांगला टिकून राहावा. या जातीची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असावी.
 • अशा प्रकारे उत्तम जातीचे सर्व गुणधर्म एकाच जातीमध्ये मिळणे अशक्य असले तरी निवडक महत्त्वाचे गुणधर्म असलेल्या जाती लागवडीसाठी निवडाव्यात.

खरीप हंगामासाठी उन्नत वाण

 • एन -53
 • बसवंत – 780 
 • अॅग्रीफाउंड डार्क रेड 
 • अर्का कल्याण 

रब्बी हंगामासाठी उन्नत वाण

 • एन 2 – 4 – 1
 • पुसा रेड 
 • अर्का निकेतन 
 • अॅग्रीफाउंड लाईट रेड 
 • एन-257 – 91 
 • ॲग्रीफाउंड व्हाईट
 • फुले सफेद 
 • फुले सुवर्णा

हंगाम आणि लागवडीचे अंतर

महाराष्ट्रात कांद्याची लागवड प्रामुख्याने खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामांत केली जाते. खरीप हंगामासाठी मे-जून महिन्यांत रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड जून-जुलै महिन्यांत करतात. जुलै-ऑगस्ट ह्या काळात तापमान 20 ते 25 अंश सेल्सिअस असते, त्यामुळे कांदा तयार होण्यास मदत होते.

सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात दिवसाचे उष्ण तापमान आणि सतत भरपूर पाऊस यामुळे करपा या रोगाचा कांद्यावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तसेच फुलकिड्यांचाही उपद्रव वाढतो. काढणीच्या वेळी पाऊस झाल्यास कांद्याची काढणी करणे, तो पातीसह सुकविणे, पात कापणे ही कामे करणे कठीण होते. या हंगामातील कांद्याला काढणीनंतर लगेचच कोंब येतात. या सर्व बाबींमुळे खरीप कांद्याची साठवण करता येत नाही. त्यामुळे खरिपातील कांदा लगेच विक्रीसाठी काढावा लागतो.

खरीप हंगामातील कांद्याला पोळ कांदा असे म्हणतात. हिवाळी हंगामासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बी पेरून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रोपांची पुनर्लागवड केली जाते. डिसेंबर-जानेवारी महिन्यांत तापमान 15 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत असते. त्यामुळे कांदे तयार होण्याची क्रिया चांगली होते. फेब्रुवारी महिन्यात रात्रीचे थंड तापमान आणि दिवसाचे उष्ण तापमान यामुळे कांदा चांगला पोसतो.

मार्च महिन्यात काढणीच्या वेळी तापमान वाढते. त्यामुळे कांद्याची पात लवकर वाळून कांदा पोसण्याची क्रिया मंदावते आणि कांदा पक्व होण्यास मदत होते. ह्या काळातील उष्ण आणि कोरड्या हवेमुळे कांद्याची काढणी करणे, तो पातीसह सुकविणे, पात कापणे, प्रतवारी करणे आणि तो सावलीत सुकविणे ही कामे करणे सोपे होते. म्हणूनच कांद्याची साठवण करायची असल्यास रब्बी हंगामात कांद्याचे पीक घ्यावे.

रब्बी हंगामातील कांद्याला रांगडा कांदा असे म्हणतात. कांद्याची उन्हाळी हंगामातही लागवड केली जाते. या हंगामासाठी डिसेंबर-जानेवारी महिन्यात कांद्याची लागवड केली जाते. ह्या हंगामातील कांदा एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात काढणीला येतो. उशिरा लागवड केल्यास पूर्वमोसमी पावसामुळे कांदा काढणे आणि सुकविणे ही कामे कठीण होतात.

नाशिक, पुणे ह्या जिल्हयांच्या काही भागात विहिरीचे पाणी ऑगस्टनंतर वाढते आणि ते जेमतेम जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध असते. त्यामुळे ह्या भागातील शेतकऱ्यांना रांगडा कांद्याची लागवड करावी लागते.

ह्या लागवडीमध्ये कांदा पोसण्याची क्रिया नोव्हेंबर महिन्यात येते आणि या काळातील कमी तापमानामुळे डेंगळे आल्यामुळे कांद्याची प्रत खालावते. मात्र याच काळात लागवड करावयाची झाल्यास त्यासाठी बसवंत-780 किंवा अॅग्रीफाउंड लाईट रेड ह्या जातींची निवड करावी. कारण या जातींमध्ये डेंगळे आणि जोडकांदे येण्याची प्रवृत्ती कमी आहे. शिवाय साठवण करावयाची झाल्यास कांदे 2 ते 3 महिने साठविता येतात.

कांदा रोपे तयार करणे

बियाण्याची उगवणशक्ती उत्तम असल्यास हेक्टरी 7 ते 8 किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्याला थायरम हे बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे चोळून घ्यावे. जमिनीत मर रोगाचा प्रादुर्भाव असल्यास जमिनीची प्रकिया थायरम ह्या बुरशीनाशकाने 100 चौ. मी. ला 500 ग्रॅम या प्रमाणात करून घ्यावी. उष्ण हवामानात रोपवाटिकेत ट्रायकोडर्मा व व्ही.ए.एम. (वेसिक्युलर आर्बीस्क्युलर मायकोरायझा) वापरून जैविक पद्धतीने मर रोगाचे नियंत्रण करता येते.

रोपवाटिकेत तणांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी रोपवाटिकेची जागा नांगरून पाणी देऊन पॉलिथीनने 10-12 दिवस झाकून निर्जंतूक करून घ्यावी. किंवा दर 100 चौ. मीटरला 12.5 ग्रॅम ‘ट्रायकोडर्मा विरीडी’ बुरशीचे मिश्रण 650 ग्रॅम कुजलेल्या शेणखतात मिसळून रोपवाटिकेच्या जागेत मिसळावे.

जमीन चांगली भुसभुशीत करून त्यात शेणखत व नत्रयुक्त खत चांगल्या प्रकारे मिसळावे. 1 हेक्टर कांदा लागवडीसाठी अंदाजे 10 आर जमिनीत रोप टाकावे. ह्या जमिनीत 4 ते 5 गाड्या कुजलेले शेणखत, 2.5 किलो नत्र व 5 किलो स्फुरद द्यावे.

पेरणीसाठी 3 मी. X 1 मी. आकाराचे गादीवाफे करावे. पेरणी ओळीमध्ये 5 सेंमी. अंतरावर व 2 सेंमी. खोल करावी. बियाणे फार दाट पेरू नये. म्हणजे रोपांची वाढ सारखी होऊन नर्सरीची देखभाल सुलभतेने करता येते.

नर्सरीमध्ये मर रोगाची लक्षणे दिसताच थायरम ह्या बुरशीनाशकाचे 0.2% (10 लीटरला 20 ग्रॅम) द्रावण जमिनीतून द्यावे. ढगाळ वातावरणात करपा रोगाची शक्यता असल्याने 0.25% मॅन्कोझेब (10 लीटरला 25 ग्रॅम) ह्या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

3 आठवड्यांनी 2.5 किलो नत्र द्यावा. 6 ते 8 आठवड्यांनी रोपे 20 ते 25 सेंमी. उंचीची झाली म्हणजेच पुर्नलागवडीस योग्य होतात. जास्त वाढ झालेली रोपे लावल्यास पिकात दोष निर्माण होतात.

कांदा लागवडीस कोणती पद्धती वापरावी ?

निरनिराळ्या भागांत कांद्याची लागवड वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. काही भागांत बी शेतात कायम जागी पेरून लागवड करतात तर अनेक ठिकाणी गादी-वाफ्यांवर रोपे तयार करून नंतर त्यांची पुनर्लागवड करतात. रोपांची पुनर्लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी-वरंब्यावर करतात. काही भागांत रोपांची पात कापून लागवड करतात, तर काही भागांत पात न कापता लागवड करतात.

1) बी पेरून लागवड करणे

कांद्याची रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड करणे हे वाढत्या मजुरीमुळे अतिशय खर्चीक झाले आहे. अनेकदा हंगामात पुरेसे मजूर न मिळाल्यामुळे कांदा लागवड वेळेवर होते नाही. म्हणूनच बी पेरून कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

या पद्धतीमध्ये रोपांच्या पुनर्लागवडीचा खर्च वाचतो तसेच कांदे पुनर्लागवड पद्धतीपेक्षा 15 ते 20 दिवस आधी काढणीला तयार होतात. परंतु या पद्धतीमध्ये खरीप हंगामात तणांचा उपद्रव जास्त प्रमाणात होतो. पेरणीनंतर 30 ते 40 दिवस कांद्याची रोपावस्था असते.

रोपे लहान असल्यामुळे पिकात खुरपणी करणे अवघड होते. तणांचा जोर रोपांपेक्षा वाढता राहिल्यास रोपांची वाढ खुंटते आणि सर्व पीक वाया जाते. पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर जरी राखता आले तरी दोन रोपांमध्ये ठरावीक अंतर राखता येत नाही. त्यामुळे विरळणी करावी लागते.

एकाच जागी 2 ते 3 बिया पडल्यास कांद्याची वाढ चांगली होत नाही. त्यामुळे चिंगळी कांद्याचे (लहान कांदा) प्रमाण वाढते. रोपांमधील अंतर राखण्यासाठी पेरणी करताना त्यामध्ये 25 पट बारीक शेणखत मिसळून पेरावे. 45 दिवसांनी तण काढून ‘स्टॉम्प’ या तण नाशकाची फवारणी करावी.

2) रोपांची पुनर्लागवड करणे

 • रोपे गादीवाफ्यावर तयार करून त्यांची पुनर्लागवड करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जाते. रोपे सपाट वाफ्यात किंवा सरी-वरंब्यावर लावली जातात. सपाट वाफ्यातील लागवड सरी-वरंब्यापेक्षा जास्त फायदेशीर ठरते. कारण सपाट वाफ्यांमध्ये रोपांची संख्या सरी-वरंब्यापेक्षा जास्त बसते.
 • रोपांच्या वाढीला चांगला वाव मिळतो, पाणी सारखे बसते, खुरपणी आणि वरखतांची मात्रा देणे, इत्यादी कामे सोपी होतात.
 • लहान किंवा चिंगळी कांद्याचे प्रमाण सरी-वरंब्यावर केलेल्या लागवडीच्या तुलनेत कमी राहते.
 • सरी-वरंब्यामध्ये सरीच्या तळात, मध्यावर आणि सरीच्या डोक्यावर रोपे लावली जातात. अशा वेळी खुरपणी अवघड होते.
 • सरीवरच्या भागात लावलेला कांदा चांगला पोसतो तर तळातील कांदा लहान राहतो. खरिपात ज्या शेतामध्ये पाण्याचा निचरा होत नाही अशा जमिनीत मात्र लागवड सरी-वरंब्यावर करावी. जमिनीचा उतार बघून 2 मीटर रुंद आणि 3 ते 5 मीटर लांबीचे वाफे तयार करावेत.
 • जमीन चांगली सपाट असेल तरी वाफ्याची लांबी आणखी वाढवता येते. सपाट वाफ्यामध्ये लागवड नेहमी कोरड्या जमिनीत करावी आणि नंतर पाणी द्यावे.
 • सरीवरंब्यात वाफ्यांना पाणी दिल्यानंतर लागवड करावी. गादीवाफ्यांवर ही लागवड करून कांद्याचे पीक घेता येते. विशेषत: ठिबक सिंचन पद्धतीमध्ये गादीवाफ्यावर लागवड करून कांद्याचे चांगले उत्पादन येते.
 • एका रोपापासून एकच कांदा मिळतो. त्यामुळे रोपांची संख्या योग्य प्रमाणावर राखणे उत्पादनवाढीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.
 • खरीप हंगामात रोपे 15 X 10 सेंटिमीटर अंतरावर आणि रब्बी किंवा उन्हाळी हंगामात रोपे 12 X 10 सेंटिमीटर अंतरावर लावावीत.
 • सरी-वरंब्यावर लागवड करावयाची झाल्यास 30 सेंटिमीटर रुंदीची सरी पाडून सरीच्या दोन्ही बाजूंवर 10 सेंटिमीटर अंतरावर एकाच ओळीत रोपे लावावीत.
 • गादीवाफे 60 सेंमी. रुंदीचे करावे. 10 X 7.5 सेंमी. अंतरावर लागवड करावी. रोपे लावताना उंच रोपांची पात कापून लागवड करावी.लागवडीसाठी शक्यतो रोपांचा खालील भाग फुगीर झालेल्या रोपांची निवड करावी.
 • लहान रोपांची लागवड केल्यास नांगे मोठ्या प्रमाणात पडतात. त्यामुळे उत्पादनात घट येते. अशा वेळी आंबवणी देताना नांगे साधून घ्यावे.
 • रोपे लागवडीच्या आगोदर 0.1 % कार्बेडेझिम + 0.15% मोनोक्रोटोफॉसचे द्रावणात मुळे बुडवून लागवड करावी.

कांदा पिकास खत व्यवस्थापन कसे करावे ?

कांदा हे नत्रखताला चांगला प्रतिसाद देणारे पीक आहे. कांद्याच्या पिकाला जमिनीची मशागत करताना हेक्टरी 40 ते 50 टन शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. कांद्याच्या लागवडीपूर्वी वाफ्यामध्ये हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.

लागवडीनंतर तीस दिवसांनी किंवा पहिल्या खुरपणीच्या वेळी 50 किलो नत्र आणि त्यानंतर 20 दिवसांनी आणखी 50 किलो नत्राची मात्रा द्यावी. नत्रयुक्त खते लागवडीनंतर दीड महिन्याच्या आतच देणे आवश्यक असते. खतांच्या मात्रा उशिरा दिल्यास पातीची वाढ जास्त होते. कांद्याची मान जाड होते आणि कांदे साठवणीत चांगले टिकत नाहीत.

कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, व बोरॉन ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते. त्यासाठी जस्त 3 पीपीएम, लोह व तांबे 1 पीपीएम व बोरॉन 0.5 पीपीएमची फवारणी लागवडीनंतर 45 व 60 दिवसांनी करावी. पिकाचे शेंडे पिवळे व पीक निस्तेज दिसत असल्यास 30 दिवसांनंतर 15 दिवसांच्या अंतराने 2-3 वेळा 1% डीएपी + 1% युरिया + 1% पोटाशियम सल्फेट + 0.5% मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी.

कांदा पिकास पाणी व्यवस्थापन कसे करावे ?

 • कांद्याच्या रोपांची कोरड्या जमिनीत लागवड केल्यानंतर पिकाला लगेच पाणी द्यावे आणि त्यानंतर 3 ते 4 दिवसानी आंबवणी द्यावी. सुरवातीच्या काळात कांद्याच्या पिकाला पाणी कमी लागते; परंतु कांदा पोसण्यास सुरुवात झाल्यावर पिकाला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. या काळात पिकाला नियमित पाणीपुरवठा करावा.
 • कांद्याच्या पिकाला जास्त पाणी दिल्यास पात वाढते, माना जाड होतात; मात्र कांदा लहान राहतो. कांद्याच्या पिकाला द्यावयाचे पाण्याचे प्रमाण आणि दोन पाण्यांतील अंतर हे पिकाच्या वाढीची अवस्था, लागवडीचा हंगाम आणि जमिनीचा प्रकार यांवर अवलंबून असते.
 • खरीप हंगामात पाऊस नसल्यास कांद्याच्या पिकाला 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे तर रब्बी हंगामात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. सर्वसाधारणपणे खरीप हंगामात 8 ते 10 पाण्याच्या पाळ्या लागतात; तर रब्बी हंगामात 15 ते 18 पाण्याच्या पाळ्या लागतात.
 • कांद्याच्या काढणीपूर्वी 20 ते 25 दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. त्यामुळे पानांतील अन्नरस कांद्यामध्ये उतरून कांदा पक्व होण्यास मदत होते आणि कांदा साठवणीमध्ये चांगला टिकतो. काढणीपर्यंत पिकाला पाणी देत राहिल्यास कांदा सडतो, त्याची मान जाड राहते, नवीन कोंब निघू लागतात. असा कांदा साठवणीत जास्त काळ टिकत नाही.
 • हल्ली ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीनेही कांद्याला पाणी देता येते. या पद्धतीमध्ये पाण्याची चांगलीच बचत होते. उत्पादन चांगले येते, वाढ एकसारखी होते आणि रोगाचे प्रमाण कमी राहते. तुषार सिंचन पद्धतीने पाण्याची 33% बचत होते. शिवाय उत्पादनात 25% वाढ होते. तुषार आणि ठिबक सिंचन पद्धतीमध्ये जमिनीत ओलावा राखला जाईल या बेताने नियमित पाणी द्यावे.

कांदा पिकात आंतरमशागत कशी करावी ?

 • कांद्याच्या आंतरमशागतीमध्ये खुरपणी करून जमीन मोकळी ठेवणे आणि तणांचा बंदोबस्त करणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. कांदा लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी शेतात तण वाढले असल्यास खुरपणी करावी.
 • खुरपणी करताना बारीक तण काळजीपूर्वक उपटून घ्यावे. ह्या खुरपणीमुळे जमीन भुसभुशीत होते आणि रोपाच्या मुळाशी हवा खेळती राहते.
 • खुरपणीनंतर खुरपलेले तण मरून गेल्यावर आणि जमीन 2 ते 3 दिवस चांगली तापल्यानंतर पाणी द्यावे. लगेच पाणी दिल्यास घोळ, चील यांसारखी तणे परत मूळ धरतात.
 • दुसरी खुरपणी पहिल्या खुरपणीनंतर 25 ते 30 दिवसांनी करावी. रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात तणांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे खरीप हंगामात खुरपणीचा खर्च जास्त येतो.
 • कांद्याच्या पिकामध्ये तणांच्या नियंत्रणासाठी रासायनिक तणनाशकांचा वापर करता येतो. कांद्यामध्ये तण उगवण्यापूर्वी मारावयाची तणनाशके अधिक उपयुक्त ठरतात; म्हणून कांद्याच्या पिकामध्ये स्टॉम्प, बासालीन, गोल किंवा ड्युअल, रोस्टार, लासो यांसारख्या तणनाशकांचा वापर करावा.
 • कांद्याची रोपे लावण्यापूर्वी कोरड्या वाफ्यामध्ये हेक्टरी 2.5 – 3.5 लीटर स्टॉम्प किंवा 0.6 – 1 लीटर गोल किंवा 1 ते 1.5 लीटर बासालीन 500 लीटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारावे आणि त्यानंतर रोपांची लागवड करून पाणी द्यावे.
 • रोपांची लागवड करून 3 दिवसांच्या आत तणनाशकाची फवारणी करावी. तणनाशकाच्या फवारणीच्या वेळी जमिनीमध्ये ओलावा असावा. तणनाशकांचा प्रभाव फवारणीनंतर जवळजवळ 45 दिवस राहतो. तणनाशकाच्या फवारणीनंतर 45 दिवसांनी आवश्यक असल्यास 1 खुरपणी करावी.

कांदा पिकात आंतरपिके कोणती घ्यावीत ?

कांदा पिकामध्ये वाफ्यांच्या वरंब्यावर कोथिंबीर किंवा मुळा यांसारखी कमी कालावधीमध्ये तयार होणारी पिके घेता येतात. कांदा पीक हे आंतरपीक म्हणून मिरची, ऊस, फळबागा यांमध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकते.

कांद्याची काढणी कशी करावी ?

कांद्याची काढणी केल्यानंतर त्याची प्रतवारी करणे, कांदा सुकविणे, पात कापणे, बाजारभाव मिळेपर्यंत कांद्याची तात्पुरती साठवण करणे या गोष्टींकडे अनेकदा नीट लक्ष दिले जात नाही. केवळ कांद्याच्या लागवडीनंतर जात आणि हवामानानुसार कांदा 3 ते 5 महिन्यांत काढणीस तयार होतो. कांदा पक्व झाल्यावर नवीन पाने येण्याचे थांबते. पानांतील अन्नरस कांद्यामध्ये उतरून कांदा घट्ट होऊ लागतो. पात पिवळसर होऊ लागते आणि गड्डयाच्या वर आपोआप वाकून खाली पडते. यालाच माना पडणे असे म्हणतात. या वेळी कांद्याची मुळे सुकू लागतात आणि त्यांची जमिनीची पकड सैल पडू लागते. साधारणपणे 30 ते 40 % झाडांच्या माना पडल्यानंतर कांदा काढणीस तयार झाला असे समजावे.

सर्व कांदा एकाच वेळी काढणीला तयार होत नाही. माना पडल्यानंतर आणि पात सुकल्यावर कांदा काढावा. कांदा जसजसा तयार होईल तसतसा काढण्याचे काम खरीप हंगामात करतात. कारण खरीप हंगामात माना लवकर पडत नाहीत. कांदा पक्व झाला तरीही पातीची वाढ चालूच राहते. अशा वेळी पक्व कांदा बघून काढावा. परंतु रांगडा, किंवा उन्हाळी कांदा काढणीला एकाच वेळी तयार होतो. या कांद्याची काढणी जानेवारी ते मे महिन्यापर्यंत चालते. या कांद्याच्या माना आपोआप पडतात. सर्व माना पडल्यानंतर कांदा एकाच वेळी काढावा. कांद्याची पात ओलसर असतानाच कांदा उपटून काढावा. पात वाळली तर कांदा उपटून निघत नाही. अशा वेळी तो खुरप्याने किंवा कुदळीने काढावा लागतो. कांदा काढणीच्या 15 दिवस अगोदर शेवटचे पाणी द्यावे आणि 20 व 10 दिवस अगोदर 0.1% बाविस्टीनची फवारणी द्यावी म्हणजे कांद्याचे साठवणीतील नुकसान कमी होते.

कांदा प्रतवारी कशी करावी ?

 • कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह 3 ते 4 दिवस ओळीत ठेवून सुकू द्यावा. शेतात कांद्याचे ढीग करून ठेवू नयेत.
 • 3 ते 4 दिवसांनी कांद्याचा वरील पापुद्रा पक्व होऊन कांदे घट्ट होतात. नंतर कांद्याची मुळे आणि पात कापावी.
 • पात कापताना कांद्याला 3 ते 4 सेंटिमीटर लांबीचे देठ ठेवून कापावी. पात अगदी जवळ कापल्यास कांदे लवकर खराब होतात. पात कापल्यानंतर कांद्याची प्रतवारी करावी.
 • जोडकांदा, डेंगळे आणि चिंगळी कांदा निवडून काढावा राहिलेला चांगला कांदा गोळा करून त्याचा सावलीत ढीग करावा आणि तो तेथे 10 ते 15 दिवस राहू द्यावा.
 • खरीप हंगामात कांद्याची कायमस्वरूपी साठवण केली जात नाही. परंतु चांगला बाजारभाव मिळेपर्यंत कांद्याची तात्पुरती साठवण करणे आवश्यक आहे.
 • रब्बी आणि उन्हाळी हंगामातील कांदा मात्र प्रतवारी करून साठवणीच्या चाळीमध्ये भरावा.
 • कांद्याची प्रतवारी करताना 6 सेंटिमीटर व्यासाचे मोठे कांदे, 4 ते 6 सेंटिमीटर व्यासाचे मध्यम कांदे, 2 ते 4 सेंटिमीटर व्यासाचे लहान कांदे अशा प्रकारे प्रतवारी करावी.

कांद्याचे उत्पादन किती मिळते

कांद्यामध्ये जातिपरत्त्वे आणि हंगामानुसार उत्पादनामध्ये फरक पडतो. खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन हेक्टरी 20 ते 25 टन इतके मिळते तर रब्बी हंगामात उत्पादन 30 ते 35 टन इतके मिळते.

कांद्याचे दर्जेदार उत्पादन कसे वाढवावे हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribes, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

Leave a Reply