सफेद मुसळी लागवड तंत्र

सफेद मुसळी हे महत्त्वाचे कंदवर्गीय पीक आहे. सफेद मुसळीच्या विविध प्रजाती जगातील उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात आढळतात. भारतात सफेद मुसळीच्या तब्बल तेरा प्रजाती सापडतात. त्यांपैकी औषधीयुक्त सहा प्रजाती महत्त्वाच्या समजल्या जातात. सर्व प्रजातींमध्ये क्लोरोफायटम बोरिव्हिलीयानम (Chlorophytum borivilianum) ही जात व्यापारीदृष्ट्या आणि औषधीदृष्ट्या फार महत्त्वाची आहे.

सफेद मुसळीला देशातील आणि परदेशातील बाजारात मोठी मागणी आहे. आदिवासी लोकांकडून सफेद मुसळीची मोठ्या प्रमाणात काढणी करून खरेदी-विक्री केली जाते. सफेद मुसळी हे भारतामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान व महाराष्ट्र या राज्यांत काही प्रमाणावर सफेद मुसळीची व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यास सुरुवात झाली आहे.

प्रस्तूत सफेद मुसळी लागवड तंत्र या लेखामध्ये आपणास सफेद मुसळी या पिकाच्या लागवडीविषयी माहिती होईल. या पिकाच्या विविध औषधी उपयोगांची माहिती होईल. सफेद मुसळी लागवड पध्दतीची माहिती शेतकऱ्यांना मिळेल, या पिकाचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेता येईल.

सफेद मुसळीचे महत्त्व व उपयोग :

  • सफेद मुसळी ही कंदवर्गीय बहुवार्षिक वनस्पती आहे. भारतातील आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सफेद मुसळीचा उल्लेख आढळून येतो.
  • सफेद मुसळी त्रिदोषहारक आहे.
  • सफेद मुसळी कंदाचा उपयोग आयुर्वेदिक औषधांत तारुण्य व जोम टिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
  • सफेद मुसळीचे चूर्ण शक्तिवर्धक, वंध्यत्व कमी करण्यासाठी व शुक्रजंतू वाढीसाठी फार उपयोगी आहे.
  • सफेद मुसळी ही हृदयाचे बल वाढविणारी तसेच उत्तेजक व रक्तस्तंभक आहे.
  • सफेद मुसळीचा उपयोग श्वेतप्रदर रोगातही करतात.
  • आदिवासी लोक सफेद मुसळीच्या कोवळ्या पानांचा भाजीसाठी उपयोग करतात.
  • सफेद मुसळीमध्ये कार्बोहायड्रेट्स् (42%), प्रोटीन्स (8.50%), सॅपोजेनीज (0.17%) सॅपोनिज (3%) तसेच सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक कॉपर ही खनिजे सापडतात.
  • रोज 3 ग्रॅम मुसळी पावडर दुधासोबत घेतल्यास आरोग्यास चांगला लाभ होतो.
  • सफेद मुसळीची आरोग्यदृष्टीत विविध फायदे मानवास मिळतात.

सफेद मुसळीचे उत्पादन कोठे होते ?

भारतामध्ये सफेद मुसळीची व्यापारी तत्त्वावर लागवड अलीकडच्या काळात सुरू झाली आहे. मात्र महाराष्ट्र राज्यात सफेद मुळसीचे उत्पादन घेतले जात नाही. जंगलामध्ये सफेद मुसळी निसर्गावस्थेत आढळून येते. आदिवासी जमाती याची लागवड हिमालय, विंध्याचल, अरवली पर्वतांमध्ये करतात; तसेच बिहार, आसाम, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात मुसळीचे पीक घेतात.

सफेद मुसळीला हवामान आणि जमीन कसे असावे ?

सफेद मुसळी या पिकाच्या लागवडीसाठी उष्ण, दमट हवामान योग्य असून कंदाच्या वाढीसाठी जमिनीतील भरपूर ओलावा आवश्यक असतो. सफेद मुसळी या पिकासाठी भुसभुशीत, गाळाची, लाल पोयट्याची, उत्तम निचऱ्याची आणि भरपूर सेंद्रिय खताचे प्रमाण असलेली जमीन चांगली मानवते. मुसळीच्या लागवडीस महाराष्ट्रात वाव आहे.

सफेद मुसळीसाठी पूर्वमशागत कशी करावी ?

सफेद मुसळी या पिकासाठी मे महिन्यात जमीन उभी-आडवी नांगरून कुळवाच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करावी. तणांचा नाश करावा. हेक्टरी 40 ते 50 टन कुजलेले शेणखत मिसळावे किंवा गांडूळखत वापरावे. लागवडीसाठी योग्य आकाराचे गादीवाफे 90 सेंमी. रुंद व 15 सेंमी. उंच सरी-वरंबे तयार करावे.

सफेद मुसळी लागवड पद्धती कशी वापरावी ?

  • सफेद मुसळी पिकाची लागवड बियांपासून रोपे तयार करून तसेच मुसळी कंदापासून करता येते.
  • बियाणे खूपच कमी प्रमाणात उगवते आणि पिकाची काढणी करण्यास 12 महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणून मोड आलेले कंद लागवडीसाठी वापरणे योग्य आहे. त्यांपासून 6 महिन्यांत खरीप हंगामात पीक तयार होते.
  • सफेद मुसळी बियांपासून लागवड बियांपासून लागवड करावयाची असल्यास पहिल्या वर्षी रोपे तयार करावीत. त्यासाठी जूनच्या सुरुवातीलाच (1 x 3 मीटर) आकाराचे गादीवाफे तयार करावेत.
  • प्रत्येक वाफ्यात 20 ते 30 किलो चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. पहिला पाऊस झाल्यानंतर प्रत्येक गादी वाफ्यात 10 सेंमी. अंतरावर ओळीमध्ये 1 ते 2 सेंमी. खोलीवर सफेद मुसळीचे बियाणे पेरावे. पाऊस नसल्यास नियमित पाणी देऊन वाफे ओले ठेवावेत.
  • सफेद मुसळी साधारणत: 20 ते 25 दिवसांनंतर बियांची चांगली उगवण होते. बियांची उगवणशक्ती बहुतांशी कमी असते. चांगली उगवण झाल्यावर पीक तणविरहीत ठेवावे.
  • ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात झाडांची पाने वाळून जातात व मुसळकंदी सुप्त अवस्थेत जातात. त्या वेळेपासून पाणी देणे बंद करावे व सदर वाफ्यातील कंद काढून त्यांच्या वजनाएवढ्या मातीत मिसळून सावलीत साठवण करावी. कंद तसेच जमिनीतील ठेवले तरी चालतात. त्यांचा उपयोग पुढच्या वर्षी लागवडीसाठी करावा.

कंदांपासून सफेद मुसळी लागवड कशी करावी ?

  • साठवलेल्या मुसळीकंदांना मे महिन्यात अंकुर फुटण्यास सुरुवात होते. त्याचप्रमाणे शेतात किंवा जंगलातील मुसळीकंदाना पहिला पाऊस झाल्यानंतर पहिल्या 5- 6 दिवसांत अंकुर फुटतात.
  • सदर अंकुरित झालेले मुसळीकंद 15-20 दिवसांनी जमा करूनही लागवडीसाठी वापरता येतात. याची लागवड 30 सेंमी. X 10 सेंमी. अंतरावर खोल करावी. एक हेक्टर लागवडीसाठी अंदाजे 350 किलो मुसळीकंद लागतात.
  • सफेद मुसळीया पिकासाठी शक्यतो शेणखताचाच नियमित वापर करावा. लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी 40 ते 50 टन शेणखत जमिनीत टाकावे. सर्वसाधारणत: रासायनिक खताचा वापर केला जात नाही.
  • कंद लागवडीनंतर पाऊस नसल्यास लगेच पाणी द्यावे. जमिनीत कायम ओलावा ठेवण्यासाठी 5-6 दिवसांनी नियमित पाणी द्यावे.
  • फवारा सिंचन पद्धतीचाही वापर करता येतो.
  • निंदणी करताना मुसळीची रोपे उपटली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. निंदणी करून शेत स्वच्छ ठवावे.

सफेद मुसळीची काढणी कशी करावी ?

  • सफेद मुसळी साधारणत: लागवडीनंतर 6 महिन्यांत मुसळीचे कंद तयार होतात.
  • ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात पाने वाळतात व परत कंद सुप्त अवस्थेत जातात.
  • पाने पिवळी होऊन वाळू लागल्यावर पाऊस नसताना नोव्हेंबर -डिसेंबर – जानेवारी महिन्यांत कंदांची काढणी करावी. त्यासाठी शेताच्या एका बाजूने जमीन खोदून मुसळीकंदाचे घोस काढावेत.
  • जमीन खोदून कंद काढताना कंदांचे तुकडे होऊ देऊ नयेत.
  • लहान आकाराचे मुसळीकंद वेगळे काढून पुढच्या वर्षीच्या लागवडीसाठी साठवण करावेत आणि चांगली वाढ झालेल्या मुसळी कंदांवरील साल चाकूने काळजीपूर्वक काढून टाकावी.
  • साल काढलेले कंद पाण्यात स्वच्छ धुऊन 1% खाण्याच्या सोड्याच्या द्रावणात भिजवून स्वच्छ कापडावर प्रथम उन्हामध्ये व नंतर सावलीत पातळ थर करून 5 ते 7 दिवस चांगले सुकवावेत.

सफेद मुसळीचे उत्पादन किती?

वाळलेल्या मुसळीचे हेक्टरी 200 ते 300 किलो उत्पादन मिळते. ताज्या मुसळीचे 1,800-2,000 किलो उत्पादन येते. उत्पादनखर्च जास्त येत असला तरी बाजारभाव चांगला मिळाल्याने फायदा होतो.

सफेद मुसळी लागवड तंत्र हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करावे.

Prajwal Digital

1 thought on “सफेद मुसळी लागवड तंत्र”

Leave a Reply