शलगम (टर्निप) उत्पादन तंत्रज्ञान

शलगम (टर्निप) हे थंड हवामानात येणारे महत्वाचे पीक आहे. उत्तर भारतात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात मोठ्या शहरांत या पिकाला चांगली मागणी आहे. लवकर आणि भरपूर उत्पादन देणारे पीक असल्यामुळे शलगमच्या लागवडीस चांगला वाव आहे.

प्रस्तुत लेखामध्ये आपणास शलगम (टर्निप) पिकाचे महत्त्व माहिती होईल. शलगम पिकाच्या विविध जातींची माहिती होईल. शलगम (टर्निप) लागवड पध्दतीची माहिती होईल. शलगम पिकाची व्यापारी तत्त्वावर लागवड करता येईल.

शलगम (टर्निप) चे व‍िव‍िध महत्त्व

  • शलगम हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे. शलगम आहारदृष्ट्या महत्त्वाचे पीक आहे. शलगम हे जमिनीत वाढणारे रूपांतरित मूळ असून या मुळाचा तसेच पानांचा भाजीसाठी उपयोग होतो.
  • शलगमच्या मुळाचा उपयोग लोणच्यासाठी करतात.
  • शलगममध्ये पोषकद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात.
  • कंदमुळापेक्षा शलगमच्या पानांत जास्त प्रमाणात जीवनसत्त्वे आणि क्षार असतात.
  • शलगमच्या 100 ग्रॅम हिरव्या पानांमध्ये 15,669 इंटरनॅशनल युनिट ‘अ’ जीवनसत्त्व असते. शलगमच्या कंदामध्ये पुढीलप्रमाणे अन्नघटक असतात.

शलगम (टर्निप) हवामान कसे असावे ?

शलगम हे हिवाळी हंगामातील पीक आहे. हे पीक जास्त थंडी सहन करू शकते. मात्र जास्त तापमानात शलगमच्या कंदांच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होऊन कंद तंतुमय, कडक आणि चवीला कडू लागतात. शलगम पिकाच्या वाढीसाठी 10 ते 15 अंश सेल्सिअस तापमान असावे लागते.

शलगम (टर्निप) लागवडीसाठी जमीन कशी असावी ?

शलगमच्या लागवडीसाठी मध्यम, कसदार, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी लागते. शलगमच्या मुळाची वाढ जमिनीत होत असल्यामुळे लागवडीसाठी निवडलेली जमीन भुसभुशीत असावी. फार हलक्या किंवा वाळूयुक्त जमिनीत शलगमची लागवड करू नये.

शलगम (टर्निप) पिकाचे उन्नत वाण कोणते ?

शलगमच्या विविध जाती आहेत. मुळाचा रंग, आकार आणि वाढीसाठी लागणारे तापमान ह्यांवरून शलगमच्या जातीचे आशियाई आणि युरोपीय असे दोन गटांत वर्गीकरण केले आहे.

) युरोपीय वाण

या जाती थंड हवामानात वाढणाऱ्या असून या जातींचे बी फक्त थंड हवामानातच तयार होते. या गटातील जातींचे कंद मऊ आणि चवीला गोड असतात. उदाहरणार्थ, स्नो बॉल, गोल्डन बॉल, पर्पल टॉप, व्हाईट ग्लोब.

1) स्नो बॉल : ही जात लवकर म्हणजे 55 दिवसांत तयार होते. ह्या जातीची पाने लहान आणि सरळ वर वाढणारी हिरव्या रंगाची असतात. या जातीचे कंद गोल आणि मध्यम आकाराचे असतात. कंदातील गर पांढऱ्या रंगाचा, कुरकुरीत आणि गोड स्वादाचा असतो.

2) गोल्डन बॉल : या जातीचे कंद मऊ आणि मध्यम आकाराचे असतात. कंदाच्या सालीचा रंग पिवळसर असतो तर कंदातील गर फिकट लालसर रंगाचा असतो. पीक 70 – 75 दिवसांत तयार होते. सरासरी उत्पन्न 20-25 टन प्रति हेक्टर.

3) पर्पल टॉप व्हाईट ग्लोब : या जातीचे कंद मोठे असून उत्पादन भरपूर मिळते. या जातीचे कंद गोल आकाराचे असतात. कंदाचा वरचा भाग जांभळ्या रंगाचा आणि खालचा भाग पिवळसर रंगाचा असतो. कंदातील गर पांढऱ्या रंगाचा, गोड आणि स्वादिष्ट असतो. पीक 60-65 दिवसांत तयार होते. सरासरी उत्पन्न 25-30 टन प्रति हेक्टर.

ब) आशियाई वाण

 या जाती उष्ण हवामानात वाढणाऱ्या असून या जातीचे बी उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात होते. या गटातील जातींचे कंद चवीला तिखट असून त्यांना थोडा उग्र वास येतो. उदाहरणार्थ, पुसा स्वेती.

पुसा स्वेती : ह्या आशियाई जातीची लागवड ऑक्टोबर महिन्यात करतात. ह्या जातीचे कंद आकर्षक पांढऱ्या रंगाचे, चपट गोल आकाराचे असतात. ही जात 45 ते 50 दिवसांत काढणीसाठी तयार होते. या जातीचे हेक्टरी सरासरी उत्पादन 20 ते 30 टन मिळते.

आशियाई आणि युरोपीय जातींच्या संकरातून काही जाती विकसित करण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, पुसा चंद्रिमा, पुसा स्वर्णिमा, पुसा कांचन.

1) पुसा चंद्रिमा : ही जात लवकर तयार होणारी आणि जास्त उत्पादन देणारी आहे. या जातीचे कंद उत्तम प्रतीचे असून या कंदांची लांबी मध्यम, 8-9 सेंटिमीटर असते. कंदाचा घेर 9 ते 10 सेंटिमीटर असतो. या जातीच्या कंदाच्या सालीचा रंग पांढरा असून साल चोपडी असते. कंदातील गर कोवळा आणि गोड असतो. या जातीचे कंद 55 – 60 दिवसांत काढणीला तयार होतात. ही जात द्विवर्षायु असून या जातीचे बीजोत्पादन थंड हवामानात होते.

2) पुसा स्वर्णिमा : जॅपनीज व्हाईट आणि गोल्डन बॉल या जातींच्या संकरातून ही जात विकसित करण्यात आली आहे. या जातीचे कंद चपटे गोल आकाराचे 6-7 सेंमी. लांब असतात. कंदाच्या सालीचा रंग पांढरट पिवळसर असतो. ही जात 65 ते 70 दिवसांत तयार होते.

3) पुसा कांचन : ह्या जातीच्या कंदाची प्रत उत्तम असते. कंदाच्या सालीचा रंग लाल तर गराचा रंग फिकट पिवळसर असतो. या जातीच्या कंदाचा वास आणि स्वाद उत्तम असतो. या जातीच्या कंदाच्या काढणीस उशीर झाला तरी कंदावर तंतुमुळे तयार होत नाहीत. या जातीचे जास्त तापमानात बीजोत्पादन घेता येते.

शलगम (टर्निप) पिकाचा हंगाम

शलगमच्या युरोपीय जातींची लागवड सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत केली जाते; तर आशियाई जातींची लागवड जुलै ते सप्टेंबर या कालावधीत केली जाते. महाराष्ट्रात शलगमच्या चांगल्या प्रतीची मुळे मिळण्यासाठी हिवाळयात लागवड करावी लागते.

शलगम (टर्निप) लागवडीचे अंतर किती असावे ?

शलगमची लागवड 30 X 15 सेंटिमीटर अंतरावर करावी.

शलगम (टर्निप) बियाण्याचे प्रमाण किती वापरावे ?

शलगमच्या लागवडीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे.

शलगम (टर्निप) लागवड कशी करावी ?

  • शलगमची लागवड सपाट वाफ्यात करता येते. लागवडीपूर्वी जमिनीची व्यवस्थित मशागत करून वाफे तयार करावेत.
  • जमीन प्रथम ओलावून घ्यावी.
  • रोपांच्या दोन ओळींत 30 सेंटिमीटर अंतर आणि दोन रोपांत 15 सेंटिमीटर अंतर ठेवून बियांची पेरणी करावी.
  • सरी-वरंबा पद्धतीने लागवड करण्यासाठी 30 ते 45 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात.
  • सरीवर 15 सेंटिमीटर अंतरावर बिया टोकून द्याव्यात. बिया 1.25 सेंटिमीटर खोल पेराव्यात.
  • शलगमचे बी लहान असल्यामुळे समप्रमाणात पेरणी होण्यासाठी बियांमध्ये बारीक वाळू किंवा कोरडी माती मिसळून बी पेरावे.
  • शलगमची लागवड बी फोकून करता येते; परंतु ओळीने बी पेरल्यास आंतरमशागत चांगली करता येते आणि उत्पादन जास्त मिळते.

शलगम (टर्निप) खते व्यवस्थापन कसे करावे ?

शलगमच्या पिकाला 15 ते 20 टन शेणखत जमीन तयार करताना जमिनीत मिसळून द्यावे. शलगमच्या पिकाला 60 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश दर हेक्टरी द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद आणि पालाशाची पूर्ण मात्रा लागवड करताना द्यावी. तर नत्राची उरलेली अर्धी मात्रा लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी मुळे पोसण्याच्या काळात द्यावी.

शलगम (टर्निप) किती पाणी द्यावे ?

पिकाला बियांच्या पेरणीनंतर हलके पाणी द्यावे. पाणी देताना बी वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर 2-3 दिवसांनी पुन्हा पाणी द्यावे. बियाण्यांची उगवण झाल्यावर जमिनीचा प्रकार, हवामान आणि पिकांच्या वाढीनुसार 10-12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

शलगम (टर्निप) आंतरमशागत कशी करावी ?

शलगम (टर्निप) बियांची उगवण झाल्यावर पिकाची विरळणी करून एका ठिकाणी 10 ते 15 सेंटिमीटर अंतरावर एकच रोप ठेवावे. त्यानंतर एक ते दोन वेळा निंदणी करून शेत तणरहित ठेवावे. बियाण्यांच्या पेरणीनंतर 25-30 दिवसांनी कंदाची वाढ चांगली होण्यासाठी हलकी खांदणी करून कंदांना मातीची भर द्यावी. याच वेळेला नत्राची राहिलेली अर्धी मात्रा द्यावी.

शलगम (टर्निप) महत्त्वाच्या कीड नियंत्रण

शलगम (टर्निप) पिकावर प्रामुख्याने काळी अळी (मस्टर्ड सॉ फ्लाय) आणि मावा (अॅफिड्स्) या किडींचा प्रार्दुभाव होतो. ह्या किडींच्या नियंत्रणासाठी उगवण झाल्यावर पिकावर 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर मॅलॅथिऑन हे कीटकनाशक मिसळून दोन वेळा फवारणी करावी.

शलगम (टर्निप) रोग नियंत्रण

शलगम (टर्निप) पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. करपा (अल्टरनेरिया) ह्या रोगामुळे पानांवर डाग पडतात. काही वेळा कंदावर हा रोग पसरतो. ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन एम-45 मिसळून पिकावर फवारणी करावी.

शलगम (टर्निप) काढणी कशी करावी ?

शलगम (टर्निप) काढणी योग्य वेळी करावी. उशिरा काढणी केल्यास कंदाची प्रत खराब होते. साधारणपणे कंदाचा आकार 5 ते 7.5 सेंटिमीटर झाल्यावर शलगमची काढणी करावी. शलगमची काढणी उशिरा केल्यास कंद तंतुमय होतात आणि चव कडू लागते. शलगमच्या मुळाची काढणी सोपी जावी म्हणून पिकाला काढणीपूर्वी हलके पाणी द्यावे आणि नंतर काढणी करावी. काढणी केल्यावर कंदाचा वरील पातीचा भाग कापून टाकावा. कंद पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत.

शलगम (टर्निप) उत्पादन किती मिळते ?

शलगम (टर्निप) पिकाचे सरासरी हेक्टरी उत्पादन 20 ते 25 टन मिळते.

शलगम (टर्निप)  विक्री कशी करावी ?

शलगमचे रोगट कंद बाजूला काढावेत आणि आकारमानानुसार प्रतवारी करावी. नंतर कंद लाकडी खोक्यात किंवा टोपलीत व्यवस्थित भरून विक्रीसाठी पाठवावेत. टोपलीत भरताना टोपलीच्या तळाशी आणि बाजूला पाने अंथरावीत व त्यावर कंद रचावेत.

शलगम (टर्निप) उत्पादन तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करावे.

Leave a Reply

Discover more from Modern Agrotech

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading