कोरडवाहू भुईमूग लागवड तंत्रज्ञान

भुईमूग हे महत्त्वाचे तेलवर्गीय पीक आहे. सोयाबीन व सुर्यफूलानंतर भुईमूग तेलाचा वापर मानवी आहारात खाद्यपदार्थात केला जातो, आणि महाराष्ट्रामध्ये भुईमूगाचे पीक मोठ्या प्रमाणावर खरीप व कोरडवाहू जमिनीवर घेतले जाते.

सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून शेतकरी बांधव रब्बीचे पिके घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे पाण्याची उपलब्धता किती आहे, पिकासाठी पाण्याची गरज किती लागेल किंवा कमीत कमी पाण्यावर म्हणजेच कोरडवाहू क्षेत्रावर कोरडवाहू भुईमूग पिकाची लागवड करावी या सभ्रमात असल्याने कारणाने त्यांना कोरडवाहू जमिनीमध्ये भुईमूग उत्पादन घ्यावयाचे असल्यास शास्त्रोक्त पद्धतीने खालील सुधारित तंत्राचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

वाचा : भुईमूग एक बहुउपयोगी पीक

भुईमूग लागवडीचे तंत्रज्ञान

भुईमुग हे तेलबिय वर्गीय पिकामध्ये एक महत्वाचे पिक असून महाराष्ट्रात कोरडवाहू भागात या पिकाखाली क्षेत्र ०.८५० लाख हे. घेतले होते, त्यापासून १.१७ लाख टन उत्पादन मिळाले आणि उत्पादकता १३७४ क्विं/हे. अशी होती. असे असले तरी भुईमूगाची प्रती हेक्टरी पीक उत्पादकता कमी आहे. प्रती हेक्टरी उत्पन्न व उत्पादकता वाढविण्यासाठी कोरडवाहू भुईमूग लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अपरिहार्य आहे.

हवामान कसे असावे ?

साधारणपणे कोरडवाहू भुईमुग लागवडीसाठी सरासरी ५०० ते १००० मिमी. वार्षीक पर्जन्यमान असलेल्या भागात लागवड करावी  व २१ ते २७ सेल्सिअस वार्षीक सरासरी तापमान आवश्यक असते. भरपूर सूर्यप्रकाश वाढीच्या काळात उष्ण तापमानाची या पिकास आवश्यकता असते.

जमीन कोणती वापरावी ?

भुईमुग पिकास सर्वसाधारणपणे मध्यम, भुसभुशीत, चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.

पूर्व मशागत कशी करावी ?

खरीपाचे पीक निघाल्यानंतर एक नांगरट करून दोन-तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. आवश्यकतेनुसार सेंद्रिय व कंपोष्ट खते मिसळून जमीन तयार करावी.

बीजप्रक्रिया कशी करावी ?

 • बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या व रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बेन्डॅझिम किंवा ३ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळावे.
 • नंतर एक किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबीयम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे बीजप्रक्रीया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरावे.

पेरणी अंतर किती ठेवावे ?

दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपातील अंतर १० सें.मी.ठेवावे. उन्हाळी हंगामात जमीन ओलवून नंतर वापशावर पाभरीने अथवा टोकण पद्धतीने पेरणी करावी. टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे कमी लागुन उगवण चांगली होते.

आंतरपिके कोणती घ्यावे ?

 • खरीप भुईमूग पिकात सोयाबीन, सूर्यफुल, तीळ, मूग, उडीद, तूर ही आंतरपीके ६ : २ या प्रमाणात भुईमूग + ज्वारी १:१ तर कपाशी १ : १ या प्रमाणात घ्यावी. आंतरपिकांमुळे अधिक आर्थिक फायदा होत असल्याचे प्रयोगाअंती दिसून आलेले आहे.
 • भुईमूग + सोयाबीन (४ : १) आणि कडेने एरंडीची लागवड (दोन ओळी) केल्यास पाने खाणारी अळीचे नियंत्रणास मदत होते.
 • सुरु ऊसात उपट्या भुईमुग वाणाची आंतरपिक म्हणून लागवड करण्यासाठी ९० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून ऊसाची लागवड केल्यानंतर एक आठवड्याने १० सें.मी. अंतरावर सरीच्या दोन्ही बाजूस उन्हाळी भुईमुगाची लागवड करावी. भुईमूग + तीळ (४ : १) या प्रमाणात आंतरपिक घ्यावे.

खत मात्रा कशी द्यावी ?  

 • पुर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी २० गाड्या कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. पेरणीच्या वेळेस २५ किलो नत्र + ५० किलो स्फुरद द्यावे.
 • खत व्यवस्थापन भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्रे सोबत जिप्सम ४०० कि/हे (२०० कि/हे पेरणीवेळी तर उर्वरीत २०० कि/हे. आऱ्या सुटतांना) जमिनीत मिसळुन द्यावे.
 • महाराष्ट्रातील हमखास पावसाच्या विभागातील मध्यम काळ्या जमिनीत उन्हाळी भुईगाच्या अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर तसेच अधिक फायद्यासाठी ५ टन शेणखत प्रति हेक्टर पुर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर द्यावे.
 • शिफारस खतमात्रेच्या १०० टक्के खते (२५ : ५० : ०० नत्र, स्फुरद, पालाश किलो/हे.) विद्राव्य स्वरूपात ठिबक सिंचनातुन ९ समान हप्त्यात

आंतरमशागत कशी करावी ?

 • पेरणीनंतर नांग्या आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरावेत. १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्यात व २ निंदण्या (खुरपण्या) द्याव्या. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी त्यामुळे पिकास मातीची भर मिळते.
 • भुईमूगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर आंतरमशागत करू नये. भुईमुगातील कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरीता पेरणीनंतर लगेच पेंडीमिथॉलिन १.०० किलो क्रि.घ. प्रति हेक्टरी १० लिटर पाण्यातुन ओलीवर फवारणी करावी.
 • पेरणीनंतर तणांच्या बंदोबस्तासाठी २०-२५ दिवसांनी परसूट किंवा टरगासुपर १५ मिली व्यापारी उत्पादन/ हे १० लिटर पाण्यातून द्यावे.

पाणी व्यवस्थापन कसे करावे  ?

 • भुईमूगास फुले येण्याची अवस्था (पेरणीनंतर २० ते ३० दिवस), आऱ्या सुटण्याची अवस्था (४० ते ४५ दिवस) आणि शेंगा पोसण्याची अवस्थेत (६५ ते ७० दिवस) एक संरक्षित पाण्याची पाळी द्यावी.
 • भुईमुग पेरणीनंतर ४-५ दिवसांनी एक पाणी (आंबवणी) द्यावे, म्हणजे राहीलेले बियाणे उगवून येईल.
 • नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसाचे अंतराने १० ते १२ वेळा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देवू नये. पीक बाष्पोपर्णोत्सर्जनाच्या ८० टक्के पाणी दिवसाआड द्यावे.

पीक संरक्षण कसे करावे ?

टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुभाव झाल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम-४५)+ २५ ग्रॅम बाविस्टीन १० लि. पाण्यात मिसळून फवारावे. भुईग पिकावरील रस शोषणाऱ्या किडिसाठी मिथिल डिमेटॉन २५ ई.सी. १० मिली प्रति १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पाने खाणारी अळी, तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळी, अमेरिकन बोंड अळी यांचे बंदोबस्तासाठी क्विनॉलफॉस २५ ई.सी. २० मिली किंवा क्लोरपायरिफॉस २० % प्रवाही २५ मिली १० ली. किंवा सायपरमेथ्रीन २५ ईसी ४ मिली १० लि. पाण्यात फवारावे.

(टीप: फवारणीसाठी कीटकशास्त्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

काढणी कशी करावी ?

भुईमूगाचा पाला पिवळा दिसू लागल्यावर आणि शेंगाचे टरफल टणक बनून अतल्या बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी. काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवाव्यात व पोत्यात भरून ठेवाव्यात शेंगातील आद्रतेचे वाळवण्यात अन्यथा बियाण्याची उगवण क्षमता कमी होत असते.

उत्पादन किती मिळते ?

कोरडवाहू भुईमूगापासून साधारणपणे प्रती हेक्टरी २५ ते ३०  क्विंटल वाळलेल्या शेंगाचे उत्पन्न निघते. तसेच पाच ते सहा टन काडाचे उत्पन्न मिळू शकते.

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

कोरडवाहू भुईमूग लागवड तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech सब्सक्राईब करावे.

Prajwal Digital

Leave a Reply