Rhizobium जीवाणू खत

रायझोबियम जीवाणू (Rhizobium Bacterial) किंवा रायझोबियम बॅक्टेरिया हे मुख्यतः द्विदल धान्याच्या मुळ्यांवर सहजीवन पद्धतीने गाठी निर्माण करून राहतात. हे जीवाणू हवेतील नत्रस्थिरीकरण व मातीतील नत्र विघटनाचे काम करतात. या बदल्यात वनस्पती त्यांना आपल्या मुळ्यात संरक्षण देतात व प्रकाश-संश्लेषण प्रक्रियेद्वारे निर्माण केलेली शर्करा (कर्ब संयुगे) अन्न म्हणून देतात. यामुळे सर्व प्रकारच्या कडधान्य पिकांसाठी रायझोबियम जीवाणू संवर्धनाचा उपयोग होतो. यासाठी रायझोबियम जीवाणू संवर्धनाचे वेगवेगळे आहेत त्यानुसार त्याचा उपयोग करता येईल.

Rhizobium जिवाणू खत म्हणजे काय ?

रायझोबियम (Rhizobium Bacterial) जीवाणूंना सहयोगी नत्र स्थिर करणारे जिवाणू म्‍हणतात. जिवाणू व्दिदल वनस्‍पतीच्‍या मुळांवर गाठी तयार करून त्‍यामध्‍ये राहतात. हे जिवाणू वनस्‍पतीकडून त्‍यांना लागणारे अन्‍न मिळवतात व हवेतील नत्र अमोनियाच्‍या स्‍वरूपात पिकांना उपलब्‍ध करून देतात. हे खत तयार करण्‍यासाठी कडधान्‍यांच्‍या मुळांवरील गाठीतून उपयुक्‍त कार्यक्षम जिवाणू अलग करून विशिष्‍ट प्रकारच्‍या माध्‍यमातून त्‍यांची मोठ्या प्रमाणावर वाढ करून निर्जंतुक केलेल्‍या लिग्‍नाईट पावडरमध्‍ये मिसळून होणाऱ्या खताला रायझोबियम जिवाणू खत असे म्‍हणतात.

Rhizobium जिवाणू खताचा वापर कोणत्या पिकांसाठी होतो?

रायझोबियम जिवाणू खते हे सर्व प्रकारच्या कडधान्य म्हणजेच द्विदलवर्गीय पिकांसाठी (उदा. तूर, मूग, उडीद, हरभरा, वाटाणा व सोयाबीन) उपयुक्त आहे. कडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी जिवाणू खतांचा वापर करणे महत्त्वाचे ठरते.

अलीकडच्या काळात डाळवर्गीय पिकात रायझोबियमचा वापर केल्याने उत्पादनात वाढ झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे बहुतांशी प्रमाणात द्विदल पिकांसाठी रायझोबियम- Rhizobium जिवाणू खताचा वापर केला जात आहे.

Rhizobium जिवाणू खते कसे वापरावे ?

 • रायझोबियम जिवाणू खत 250 ग्रॅम वजनाच्‍या पाकिटात उपलब्‍ध असते. हे पाकिट 10 ते 15 किग्रॅ बियाण्‍यासाठी वापरावे. खताची पावडर पुरेशा पाण्‍यामध्‍ये मिसळून त्‍याचे घट्टद्रावण तयार करावे.
 • तयार केलेले द्रावण बियाण्‍यांवर हलक्‍या हाताने, सारख्‍या प्रमाणात लेप बसेल, परंतु बियाण्‍याचा पृष्‍ठभाग खराब होणार नाही अशा पद्धतीने लावावले. लेप लावलेले बियाणे सावलीत स्‍वच्‍छ कागदावर अथवा किलतानावर सुकवून लगेच पेरणी करावी.

Rhizobium-रायझोबियम जिवाणू गट पिके

एकाच प्रकारचे रायझोबियम जिवाणू खत सर्वच शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही. वेगवेगळया गळातील पिकांना विशिष्‍ट प्रकारच्‍या रायझोबियम गटाचे जिवाणू खत वापरतात. त्‍यानुसार त्‍याचे पुढील सात गट पडलेले आहे :

 1. रायझोबियम जिवाणू : चवळी, भुईमूग, तूर, मूग, उडीद, वाल, मटकी, गवार, ताग, धैंचा, कुळीथ
 2. रायझोबियम ल्‍युपिनी : हरभरा
 3. रायझोबियम ल्‍युमिनोसेरम : वाटाणा, मसूर
 4. रायझोबियम फॅसीओलाय : सर्वप्रकारचा घेवडा गट
 5. रायझोबियम जॅपोनीकम : मेथी, बरसीम घास
 6. रायझोबियम मेलिलोटी : मेथी, लसूण घास
 7. रायझोबियम ट्रायफोली : बरसीम घास

Rhizobium-रायझोबियम जिवाणू खताचे फायदे

 1. बियाण्‍यांची उगवण लवकर व चांगली होते.
 2. पिकास नत्राचा सतत पुरवठा होत असल्‍याने रोपांची वाढ जोमदार होते.
 3. जीवाणूंनी सोडलेल्‍या बुरशीरोधक द्रव्‍यांमुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते.
 4. जमिनीत कर्ब-नत्राचे प्रमाण योग्‍य राखून जमिनीचा कस सुधारतो.
 5. कडधान्‍ये पिकाचे उत्‍पन्न 15 ते 20% ने वाढते.
Prajwal Digital

1 thought on “<strong>Rhizobium जीवाणू खत</strong>”

Leave a Reply