एकरी २०० टन ऊस उत्पादनाचा मानस

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगांव, व्हीएसआय मांजरी पुणे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांचे तंत्रज्ञानानुसार आणि मार्गदर्शनाखाली प्रयोग करून एकरी २०० टन ऊस उत्पादन मिळवायचे असा मानस दाखवला आहे.

सिंदमेळा शेतकरी विकास मंच आणि ऊस संजीवनी संजीव माने ग्रुप आष्टा वतीने गेली २८ ते ३० वर्षे ऊस उत्पादन वाढीसाठी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयोग करीत आहे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगांव, व्हीएसआय मांजरी पुणे, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांचे तंत्रज्ञानानुसार आणि मार्गदर्शनाखाली प्रयोग केले.

यापूर्वी उस उत्पादनाचा आढावा :

यापूर्वी सन १९९४ ला उसाचे उत्पादन ८६ टन मिळायचे. त्यानंतर २००२ ला १०४ टन, २०१० ला १४१ टन, १९९७ ला १०० टन, २००० ला १०२ टन, २००४ ला १०७ टन, २००७ ला १२१ टन, २०१५ ला १४८ टन,२०१७ ला १६८ टन असे अनेक उच्चांक मिळवता आले आणि प्रती एकरी उसाचे २०० टन उत्पादन मिळविण्याचे उद्देश समोर ठेवला आहे.

एकरी २०० टन ऊस उत्पादनाचा टप्पा गाठण्‍यासाठी डॉ. बाळकृष्ण जमदनी सर, प्राध्यापक अरूण मराठे सर, डॉ. बी. पी. पाटील सर यांचे मार्गदर्शनाखाली २०० टनाचा पथदर्शक प्रयोग शास्त्रोक्त पध्दतीने सुरू आहे. येत्या दोन चार वर्षात २०० टनाचे लक्ष्य निश्चित गाठणारच असे त्यांनी सांगितले.

शास्त्रीयदृष्टीकोनाचा आधार :

यशस्वी ऊस बागायतीमध्ये अनेक शास्त्राचा सहभाग आहे. त्यामध्ये गणितशास्त्र, मृदा रसायनशास्त्र, स्थापत्यशास्त्र, मृदा भौतीकशास्त्र, जीव रसायनशास्त्र, सूक्ष्म जीव विज्ञान, खनिजशास्त्र, वनस्पती शरीरशास्त्र, अर्थशास्त्र, कृषिविद्याशास्त्र, किटकशास्त्र, वनस्पती जननशास्त्र आणि महत्वाचे म्हणजे हवामानशास्त्र यांचा अभ्यास करावयास पाहिजे.

या प्रत्येक शास्त्रातील कांही आडाखे महत्वाचे आहेत की जे आपण आत्मसात केले पाहिजेत तर आपण सहज सरासरी १०० टन १२५ टन नव्हे तर २०० टनापर्यंत उत्पादन मिळवू शकते.

Co-86032 Village : Lakhamapur, Dist. Latur

एकरी २०० टन ऊस उत्पादनासाठी कांही मुद्दे समजावुन घेऊन अंमलात आणावेत

 • जमीनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय खताचा म्हणजे शेणखत कंपोस्ट खत. गांडुळ खत यांचा योग्य प्रमाणात वापर केला. दिलेली रासायनिक खते आणि जमीनीत शिल्लक असलेली खते ऊसाला खाण्यायोग्य करून देण्याचे कार्य जिवाणु करीत असतात.
 • जिवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता वाढण्यासाठी जमीनीतील सेंद्रिय कर्बाची मात्रा वाढवावी लागते. सेंद्रिय खताची मात्रा दिल्याने सेंद्रिय कार्बन वाढतोच शिवाय मातीच्या कणांची रचना सुधारते ह्युमस ह्युमिक अॅसिड वितंचके संजीवके वगैरेची निर्मीती उत्तम होऊन जमीनीची सुपीकता वाढते.
 • ऊस लागणीची पध्दतीमध्ये ५ फुटी सरी एक डोळा दीड फुटावर सरीत आडवा बीज प्रक्रीया करून लागण केली. एकरी कारखान्यास तुटून जाणान्या पक्व ऊसांची संख्या सरासरी ४० हजारा पेक्षा जास्त नसते.
 • सुरुवातील साधारण ६० ते ७० हजार फुटवे असावेत. पैकी २० ते ३० हजार फुटवे खोडकिड, कांडीकीड इतरही कांही किड रोग यामुळे मरतात. ऊसाच्या लागणीसाठी एकरी साधारण ७ ते ८ हजार टिपरों एक डोळयाचे किंवा दोन डोळ्याचे टिपरे लावावेत.
 • प्रत्येक बेटात ८ ते १० फुटवे यावेत. या पेक्षा जास्त फुटवे आले तर ते शेवट पर्यंत जगत नाहीत.
 • सात आठ महीने जमीनीतील अन्नद्रव्ये खाऊन जगण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी गर्दीमुळे सर्व ऊसांच्या पानावर सुर्यप्रकाश न मिळाल्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया कमी होते आणि अन्नद्रव्ये कमी तयार झाल्याने असे ऊस मरून जातात.
 • अन्नद्रव्ये खाऊन शेवटी मरणारे फुटवे जेवढे जास्त तेवढे शेवट पर्यंत जगणाऱ्या ऊसाला कमी खायला मिळते. उत्पादनावर वाईट परीणाम होतो.
 • माती परीक्षणानुसार आणि २०० टनासाठी रासायनिक खताच्या मात्रा तज्ञांचे मार्गदर्शनाखाली ठरवुन पुरवल्या.
 • माती परीक्षण आणि विद्यापीठाने प्रसारीत केलेल्या अपेक्षित ऊस उत्पादनाच्या सुत्राचा उपयोग करून रासायनिक खताच्या मात्रा प्रमाणात आणि योग्य वेळेत योग्य ठिकाणी दिल्या तर ऊसाचे अपेक्षित उत्पादन मिळु शकते.
 • नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य अन्न द्रव्ये आणि योग्य प्रमाणात दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्ये देणे अत्यंत महत्वाचे आहे.
 • पाण्याच्या व्यवस्थेसाठी ठिबक सिंचनने गरजेनुसार पाणी पुरवले, ऊसाच्या मुळाच्या परीसरात जेवढे पाणी उपलब्ध होईल तेवढेच पाणी वापरू शकते.
 • मुळाच्या परिसरावरती अथवा खाली कितीही पाणी असले तरी त्याचा पिकाच्या दृष्टीने फारसा उपयोग होत नाही. दिलेले पाणी मुळाच्या परीसरात कसे राहील यावरच त्या पाण्याची उपयुक्तता अवलंबुन असते. थोडे थोडे पाणी सारखे सारखे पाणी द्यावे.
 • आजही तीन प्लॉटवरती फॉगर्स बसवलेले आहेत आणि २०० टनाचा प्रयोग पहाण्यासाठी उपलब्ध आहेत. पारंपारीक शेतीस आधुनिक शास्त्राची जोड देऊन अधिकाधिक उत्पादन मिळवता येते.
 • जमीनीची सुपीकता लागणीची पध्दत, खताचे नियोजन, पाण्याचे व्यवस्थापण पीक संरक्षण, योग्य तापमाण आणि आर्द्रता नियंत्रण सोबत संजीवकाच्या फवारण्या अशा सर्व बाबी शास्त्रानुसार समजून केल्या तर निश्चितच उत्पादनात प्रचंड वाढ मिळते. आपल्या सर्व शेतकरी बांधवासाठीच नवनव संशोधन केले जाते. या संशोधनाचा फायदा करून घ्यावे एवढीच माफक अपेक्षा.
 • ऊस उत्पादनामध्ये आर्द्रता ६० ते ९० टक्के आणि तापमान १६ ते ३५ डिग्री असावे लागते. या पेक्षा कमी किंवा जास्त तापमानामध्ये ऊस पीकास जमीनीतील उपलब्ध अन्न द्रव्याचे शोषण होत नाही. वाढलेले तापमान कमी करणे आणि कर्मी झालेली आद्रता वाढवणे या साठी प्लॉट वरती फॉगर्स बसवले.
 • २० मिनीटे फॉगर्स चालवले की ६ डिग्रीने तापमान कमी होत होते आणि आर्द्रता १० टक्क्यांनी वाढत होती. तापमान आणि आर्द्रता योग्य राहील्याने अन्नद्रव्याचे शोषण उत्तम झाले.
 • किटकनाशक, बुरशीनाशके फवारणीतून आणि जमीनीतुन पुरवुन रोग, पीक संरक्षणासाठी वेळच्या वेळी आणि आवश्यकतेनुसार ऊसाला कीड, हुमणी, वाळवी मुक्त ठेवला. वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी उपाय केले.
 • उत्पादन वाढीसाठी संजीवकांच्या सहा फवारणी केल्या. यामध्ये जिबरेलिन्स, सायटाके सायनिन्स, ऑक्झिन्स, ट्रायकॉन्टिनॉल इत्यादी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपयोग केला.
 • अशा संजीवकाच्या फवारणीमुळे पेशींची संख्या आणि आकार वाढतो. परिणामी पेरांची लांबी जाडी वाढते. पानांची लांबी रुंदी वाढते. पानांचा आकार वाढल्याने सुर्यप्रकाश जास्त घेतला जातो. प्रकाश- संश्लेषन क्रिया जास्त होऊन जास्तीचे उत्पादन मिळते. ऊसाच्या रिकव्हरीत वाढ होते.
 • ऊस उत्पादनामध्ये आद्रता ६० ते ९० टक्के आणि तापमान किमान १६ ते कामल ३५ डिग्री असावे लागते. यापेक्षा कमी किंवा जास्त तापमानामध्ये ऊस पीकास जमीनीत असणाऱ्या उपलब्ध अन्नद्रव्याचे शोषण करता येत नाही.
 • वाढलेले तपमान कमी करणे आणि कमी झालेली आर्द्रता वाढवणे यासाठी प्लॉट वरती फॉगर्स बसवले. २० मिनीटे फॉगर्स चालवले की ६ डिग्रीने तापमान कमी होत होते आणि आर्द्रता १० टक्केनी वाढत होती.
 • तापमान आणि आद्रता योग्य राहील्याने अन्नद्रव्याचे शोषण उत्तम झाले. परीणाम एकरी १६८ टन एवढे उच्चांकी उत्पादन मिळाले. ही सर्व कमाल विज्ञानाची आहे. यात शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाची खरी गरज आहे.

वरील तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने होणारे फायदे :

 • पारंपारिक उस लागवड पद्धतीच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळेल.
 • कृषि निविष्ठा व खतांचा संतुलित वापर करता येईल.
 • उसाची गुणवत्ता, वाढ व दर्जा उत्तम राखला जाईल.
 • २०० टनांचे विक्रमी उत्पन्न शेतकऱ्यांना घेणे शक्य होईल.
 • शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व उन्नती होण्यास मदत मिळेल.

कृषिरत्न तथा प्रयोगशील ऊस उत्‍पादक शेतकरी श्री. संजीव माने, आष्टा, सांगली, महाराष्‍ट्र

Prajwal Digital

Leave a Reply