खेकडा व्यवसायातून मिळाले चार ते पाच लाखाचे उत्पन्न

श्री. शांताराम भाऊ वारे, रा. मेंगाळवाडी. ता. शिरूर, जि. पुणे

श्री शांताराम भाऊ वारे यांचा जन्म जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील मेंगाळवाडी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. आपले पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी ओतूर येथेच पूर्ण केले शिक्षणानंतर आपले ०२ बंधूंसोबत वडिलोपार्जित दीड एकर शेतीत हंगामी पिके (सोयाबीन, कांदा) घेत शेती व्यवसाय सुरुवात केली मात्र पारंपरिक शेतीतील उत्पन्नाचे कमी अधिक प्रमाण, हवामान बदलाचा होणारा परिणाम यामुळे शेतीला जोडधंदा असावा यासंदर्भात त्यांनी विचार सुरू केला. अनेक ठिकाणी चौकशी तसेच मार्केटचा अभ्यास करून त्यांनी तुलनेने कमी गुंतवणूक, खर्च व स्पर्धा असणाऱ्या गोड्या पाण्यातील खेकडा पालन करण्याचा निर्णय घेतला.

खेकडा व्यवस्थापन बाबी

  • गोड्या पाण्यातील खेकडापालनाविषयी फार कमी माहिती उपलब्ध होती, मात्र ग्रामीण जीवनातील अनुभव व कल्पकता यांच्या आधारे त्यांनी आपल्या घराजवळच कल्पकतेने अंदाजे २० x १५ फूट लांबी-रुंदीची व चार फूट खोलीची टाकी बनवली. त्याच्या बाजूस १५ X ६ फूट आकाराची दुसरी छोटी टाकी बनवली.
  • या छोट्या टाकीत पूर्ण पाणी भरून ठेवले जाते. तर मुख्य टाकीत अर्धा फूट पाणी सोडून त्यात खेकडे पालन केले जाते.
  • खेकड्यांचे बीज व पैदास पिंपळगाव जोगा धरणातून पिंजऱ्यात खेकडे पकडणाऱ्या व्यक्तींकडून छोटे खेकडे व पिले विकत घेण्यात येतात. ती टाकीत सोडून त्यांचे संगोपन केले जाते.
  • एक मादी सुमारे पाचशे ते एक हजार पिले देते. त्यामुळे खेकड्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते.
  • सर्वसाधारण वर्षभरानंतर खेकडा विक्रीयोग्य होतो. प्रति खेकड्याचे अंदाजे वजन २०० ग्रॅमपर्यंत असते. साधारण चार ते पाच खेकड्यांचे वजन एक किलोच्या आसपास भरते.
  • खेकडे ठेवलेल्या टाकीतील पाणी साधारण पंधरा दिवसांतून एकदा बदलावे लागते. त्यासाठी छोट्या टाकीतून पाणी घेण्याची व्यवस्था केली आहे.
  • खेकड्यांना अन्न म्हणून काही प्रमाणात सुकट दिली जाते. घरातील शिल्लक राहिलेले अन्न वा भात यांचाही वापर होतो.
  • खेकड्याना अन्न अत्यल्प लागते त्यामुळे त्यावरील खर्च नाममात्र होतो परिणामी नफा अधिक मिळतो. खेकडे टाकीच्या वरती येऊ नयेत म्हणून टाईल्सची व्यवस्था केली आहे.

मार्केटिंग व विक्री

  • मार्केटिंग व विक्रीद्वारे यांच्याकडे खेकड्यांची चौकशी होऊ लागली. आज तीनशे रुपये प्रति किलो दराप्रमाणे जिवंत खेकड्याची विक्री केली जात आहे.
  • पूर्वी दिवसाला १० किलोपर्यंत खप व्हायचा. आता हीच संख्या ३० ते ३५ किलोपर्यंत पोचली आहे.
  • प्रति किलो खेकडा बाजारात सरासरी दर रू. ५०० ते ६०० या प्रमाणे मिळाला.
  • बाजारात नेऊन विक्री करण्याची गरज भासत नसून ग्राहक स्वतः संपर्क करून घरूनच खेकडे विकत घेऊन जातात.
  • खेकडा पालनासोबत आता घरगुती पद्धतीने बनविलेल्या खेकडा व रस्साभाजी यांचीही विक्री केली जात आहे.

इतर उत्पादन

  • खेकडा व रस्साभाजी सोबत रानभाज्या विक्री, रानभाज्या डिश, लोणचे यांचीही विक्री चालू आहे.
  • आत्मा अंतर्गत सह्याद्री आदिवासी महिला बचत गट स्थापन करून आपल्या व्यवसायात अनेक महिलांना सामावून स्थानिक रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे.

पुरस्कार व कुटुंबाची साथ

  • कृषि विभागाच्या मदतीने फळबाग क्षेत्र वाढ केली जाणार आहे. महाराष्ट्र शासन कृषि विभागाने २०१९ मध्ये अदिवासी गटातून त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
  • भविष्यकालीन योजनेत हॉटेल व्यवसायात तसेच लोणचे व्यवसायात आपला जम बसविण्याचा मानस आहे.
  • आपले कौशल्य, कल्पकता, अभ्यास यांच्या आधारे वारे कुटुंबीयांनी संपादन केलेले यश सर्वांना मार्गदर्शक आहे.

खेकडा व्यवसायाची विशेष बाब :

  • खेकडा पालन हा एक महत्त्वाचा शेतीपूरक व्यवसाय आहे.
  • ग्रामीण भागातील वाढती बेकारी व बेरोजगीर कमी करता येईल.
  • शाश्वत शेतीपूरक व्यवसाय चालना मिळेल.
  • खेकडा हा आरोग्यासाठी महत्त्वाचा असल्याकारणाने त्यास पंचतारांकित हॉटेल्समध्ये खूप मागणी आहे.
  • कमी गुंतवणूक, खर्च व स्पर्धा या तुलनेने चांगल्या प्रकारे करता येणारा व्यवसाय आहे.

जिद्द व मेहनत या बळावर ग्रामीण भागातील श्री. शांताराम भाऊ वारे यांनी खूप चांगल्या प्रकारे खेकडा पालन व्यवसाय उभारणी करून त्यातून आर्थिक प्रगती साध्‍य केलेली आहे. त्यांना खेकडा पालन व्यवसायातून दरवर्षी ४-५ लाख रूपये उत्पन्न प्राप्त होत आहे. या पुढे सुद्धा चांगल्या प्रकारे खेकडा व्यवसाय करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

शब्‍दांकन- Kishor Sasane, Latur

Prajwal Digital

Leave a Reply