डिजीटल कृषी जाहिरात

डिजीटल कृषी जाहिरात या लेखामध्ये आपल्याला कृषीविषयक जाहिरात म्हणजे काय हे समजेल. कृषीविषयक जाहिरातींच्या विविध व्याख्या माहीत होतील. कृषीविषयक जाहिरातींचे उद्देश व महत्त्व आणि त्याचबरोबर कृषि-जाहिरातीची गुणवैशिष्ट्ये याबद्दलसविस्तर माहिती मिळेल.

व्यापारीकरणाला महत्त्व आलेल्या आजच्या युगात जाहिरात जळी, स्थळी, काष्ठी व पाषाणी भरून राहिली आहे. आजचे युग हे जाहिरातीचे आहे. कारण जाहिराती आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेल्या आहेत.

डिजीटल जाहिराती कशा प्रसिद्ध होतात ?

आपण सकाळी उठल्यापासून आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या जाहिराती ऐकतो. दूरचित्रवाणीवर विविध जाहिराती प्रक्षेपित होतात, त्या पाहतो. वृत्तपत्रांत विविध जाहिराती छापून येतात, त्या वाचतो.

रस्त्यात मोठमोठे बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक लावलेले असतात. त्यांवरील जाहिराती जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. रस्त्यात काही इलेक्ट्रॉनिक जाहिराती झगमग करीत असतात.

दुकानात जा, हॉटेलात जा; जाहिरातीच दिसून येतात. बसमध्ये, ट्रेनमध्ये, क्रिकेट मॅच प्रक्षेपित होताना सगळीकडे जाहिरातीशिवाय काहीच आढळत नाही आणि या सर्व जाहिरातींचा आपल्या आचार-विचारावर, आपली जीवनमूल्ये, आपली निर्णयप्रक्रिया, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडण, आर्थिक उत्कर्ष, व्यवसाय, व्यवसायातील निर्णय अशा अनेक संदर्भात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परंतु निश्चित असा प्रभाव पडत असतो.

थोडक्यात, जाहिरातीचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नाही अशी क्वचितच एखादी गोष्ट वा क्षेत्र असेल. ईश्वराप्रमाणे जाहिरात सर्वव्यापी झाली आहे. शेती हा पण एक व्यवसाय/व्यापार म्हणून पाहण्यात येऊ लागलेला आहे. शेतीचा व्यवसाय वाढविण्यासाठी शेतीविषयक जाहिराती आवश्यक आहेत. त्यामुळे कृषीविषयक जाहिराती आज आपल्याला विविध माध्यमांद्वारे झळकताना दिसतात.

आज आपण कोठेही असलो तरी शेतीविषयक वा अन्य जाहिराती आपला पाठलाग सोडत नाहीत. या कृषीविषयक जाहिराती वाचकाला, ऐकणाऱ्याला, पाहणाऱ्याला शिक्षित करतात. त्यांचे मन वळवितात. वस्तू विकत घ्यायला उत्तेजित करतात. वस्तूबाबत माहिती देतात.

वर्तमानपत्राचे क्षेत्र हे जनसंवादाचे एक प्रभावी माध्यम आहे. आकाशवाणी आणि दूरचिवाणीसारखी माध्यमे जगात उपलब्ध होऊनही लोकमत घडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणून वर्तमानपत्रांचे महत्त्व कायम आहे.

स्वाभाविकपणे वर्तमानपत्रे, नियतकालिकांतील जाहिरातींनाही महत्त्व आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंचे जाहिरातदार आता मोठ्या प्रमाणावर दूरचित्रवाणीकडे वळले असले तरी छपाई माध्यमातील जाहिराती आपले स्थान टिकवून आहेत.

छोट्या जाहिराती, नोकरभरती, निविदा – सूचना, न्यायालयीन नोटीस यांसारख्या जाहिरातीचे स्वरूप लक्षात घेता वर्तमानपत्राचे माध्यम त्यासाठी अपरिहार्य आहे. रंगीत छपाईमुळे जाहिराती अधिक आकर्षक स्वरूपात मांडता येऊ लागल्याने जाहिरातीसाठी या माध्यमांच्या उपयोगाला पुष्टी मिळाली आहे (कापडाची रंगसंगती छापील रंगीत जाहिरातीत अधिक चांगली प्रदर्शित करता येते).

वर्तमानपत्रातील एखादी चांगली जाहिरात आपले लक्ष वेधते. आपण ती वाचतो. ज्या वस्तूची ती जाहिरात असते ती खरेदी करायला आपण लगेच बाहेर पडत नसलो, तरी चांगली जाहिरात म्हणून आपण त्या जाहिरातीच्या मसुद्याला दाद देतो. ही दाद कधी त्या मसुद्यातील मध्यवर्ती कल्पनेला (Theme) असते, तर कधी अनुकूल शब्दयोजनेला ! काही वेळा आपल्याला त्यात दुरुस्तीही सुचते.

आपल्याला अशी जाहिरात लिहिता येणार नाही का, असाही विचार चमकून जातो. संवादकौशल्यावर आपली हुकूमत चालत असेल तर त्यात अशक्यही काही नाही. जाहिरातीच्या मसुद्यात संवादकौशल्याची कसोटी लागत असल्याने मसुदालेखनाची तंत्रे व कौशल्ये शिकणे म्हणजे संवादकौशल्य आत्मसात करण्यासारखेच आहे. त्या मसुद्यात शब्द तोलूनमापून वापरले जातात. शब्दात अणूच्या सामर्थ्याइतकी ताकद असते.

जाहिरातीवरील खर्च ही गुंतवणूक असते आणि ती या मसुद्यातील शब्दांच्या रूपात असते, हे मसुदालेखकाने सदैव ध्यानात ठेवायचे असते. मसुदालेखकाने आवश्यक असलेली तंत्रे व कौशल्ये आत्मसात करणे वाटते तेवढे सोपेही नाही.

कृषि-जाहिरात म्हणजे काय ?

 • जाहिरात म्हणजे काय ? बाजारपेठेचे स्वरूप, त्यामधील उलाढाल, अर्थकारण, ग्राहकांचा, माध्यमाचा स्वभाव, सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ, अनुरूप शब्दयोजना अशा विविध घटकांचे सखोल व अद्ययावत ज्ञान या मसुदालेखनासाठी आवश्यक आहे. या सर्व घटकांचे सफल रसायन म्हणजे एखादी लक्ष वेधून घेणारी जाहिरात होय.
 • अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन या संस्थेने जाहिरातीची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे : ‘एखादी कल्पना, वस्तू किंवा सेवा यांच्या विक्रीवृद्धीसाठी अथवा ते सादर करण्यासाठी संबंधित गोष्टींची माहिती असणाऱ्याने पैसे खर्च करून व्यक्तिगत पातळी ओलांडून केलेला (सार्वजनिक) प्रयत्न म्हणजे जाहिरात होय.’
 • वेबस्टर यांच्या मते, ‘जनतेला सूचना देण्याची किंवा जनतेसमोर घोषणा करण्याची क्रिया म्हणजे जाहिरात.’ कोपलॅन्ड यांच्या शब्दांत ‘विक्री वाढावी आणि ग्राहकांचा आश्रय वाढावा अथवा तो टिकून राहावा यासाठी अवलंबिलेल्या सर्व अव्यक्तिगत पद्धतींचा जाहिरातीत अंतर्भाव होतो.’

कृषि – जाहिरातींचे उद्देश व महत्त्व

 • जाहिरात म्हणजे काय आणि ती कशासाठी, हे या म्हणीतून बरेचसे स्पष्ट होते. शास्त्रीय परिभाषेत जाहिरात म्हणजे ‘एखादी वस्तू अथवा सेवेच्या विक्रीसाठी किंवा एखादी कल्पना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यमांद्वारे पैसे देऊन केलेली प्रसिद्धी’.
 • याचा अर्थ जाहिरातीमागे व्यापारी हेतू आहे. जाहिरातीमुळे ग्राहक-शिक्षण होते. जाहिरात ही मोफत प्रसिद्धी मात्र नव्हे. जाहिरात करताना जनसमूह डोळ्यांसमोर असतो. व्यक्ती नसते. जाहिरात कोण करत आहे हे उघड केले जाते.
 • जाहिरातीने फसवू नये. शेतीत, व्यापारात जाहिरातीला खूप महत्त्व आहे. विपणनातील ते एक महत्त्वाचे अंग आहे. जाहिरात ग्राहकांना वस्तूबद्दल माहिती देऊन मागणी निर्माण करण्यास, वाढविण्यास मदत करते.
 • जाहिरातदारांच्या उत्पादनाचे वेगळेपण स्पष्ट करते. ग्राहकांची निष्ठा टिकविते. काही वेळा मागणी रोखण्यासाठी किंवा मागणी कमी व्हावी म्हणूनही जाहिरात प्रयत्न करते (उदाहरणार्थ, पाणी वाचवा, वीज वाचवा).
 • जाहिरात संस्थेची प्रतिमा निर्माण करते, राखते. राष्ट्रीय एकात्मता, कुटुंब नियोजन, पोलिओ निर्मूलन, अमली पदार्थांविरुद्ध मोहीम, पर्यावरण संरक्षण आदींचा प्रसार जनतेत व्हावा यासाठी जाहिरात हे प्रभावी माध्यम आहे.
 • निविदा, न्यायालयीन नोटिसा, नोकरभरती, हरवले, सापडले यांच्यासाठी जाहिरातीचा वापर केला जातो. अलीकडे भारतातही निवडणुकीत मतदारांचे मन वळविण्यासाठी जाहिरातीचा वापर सर्व राजकीय पक्ष करताना दिसतात.
 • उपवर वधूवर आपली जाहिरात करतात. मित्र पाहिजेत अशीही जाहिरात दिसते. इतकेच काय पण आईचे दूध हेच इतर अन्नापेक्षा बाळाला पोषक व आरोग्यवर्धक असते याची जाहिरात करावी लागत आहे. यावरून जाहिरातींचे महत्त्व लक्षात येईल.

कृषी जाहिरातीची गुणवैशिष्ट्ये

जाहिरात करणे ही एक कला आणि शास्त्र आहे. शास्त्र म्हटले की, काही तत्त्वे, काही गुणवैशिष्ट्ये आलीच. जाहिरातीची गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील :

 • प्रसारमाध्यमांच्या दरपत्रकाप्रमाणे, पद्धतीप्रमाणे जाहिरातदारास पैसे मोजावे लागतात.
 • जाहिरातदार संस्था, कंपनी वा व्यक्तीचे नाव स्पष्टपणे सांगितलेले असते.
 • विक्रीवृद्धीबरोबरच प्रतिमा वाढविणे, प्रसिद्धी, लोकसंपर्क, समाजसेवा, प्रतिमा निर्माण करणे ही उद्दिष्टे असू शकतात.

कृषी जाहिरातीचे फायदे

 • कमी कालावधीत व्यवसाय व उद्योगाची ब्रॅन्डींग चांगल्या प्रकारे करता येते.
 • कमी कालावधीत व्यवसाय ऑनलाईन प्रणालीद्वारे विकसीत करता येतो.
 • उद्योग – व्यवसायाचा दर्जात्मक व गुणात्मक पार्श्वभूमी स्पष्ट करता येते.
 • मोठा जनसमूह किंवा उद्योगाशी निगडित उत्पादकांना आकर्षिक करता येते.
 • कमीत कमी खर्चात डिजीटल माध्यमाद्वारे जाहिरात प्रसिद्ध करता येते.
Prajwal Digital

Leave a Reply