आपल्याकडे हंगामी पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर तणांचा प्रादुर्भाव झालेला आढळून येतो. तणांचा प्रादुर्भाव आढळल्यास आपण तणे उपटून किंवा रासायनिक तणनाशकाचा वापर करून तणांचा बंदोबस्त करत असतो. मात्र सेंद्रिय शेती ही रसायनविरहित केली जात असल्याने त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे रसायन वापरता येत नाही. म्हणजेच तणांचा बंदोबस्त करण्यासाठी जैविक पद्धतीचा अवलंब करावा किंवा सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक तत्त्वानुसार तणांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते. ज्यामुळे तणे नष्ट होऊन पिकांची वाढ चांगली होते.
प्रस्तुत सेंद्रिय शेतीत तणांचे व्यवस्थापन कसे करावे या लेखामध्ये आपणास तण म्हणजे काय, तणांचे सेंद्रिय पद्धतीने नियंत्रण कसे करावे, तणांचे जैविक व्यवस्थापन व सेंद्रिय शेतीत तण नियंत्रणामुळे होणारे फायदे याविषयी माहिती मिळणार आहे.
तण म्हणजे काय ?
शेतात नको असलेली नको त्या ठिकाणी येणारी किंवा पिकांना नुकसानकारक व उत्पादनावर प्रतिकूल परिणाम करणारी अशी कोणतीही वनस्पती म्हणजे तण होय.
तण व्यवस्थापनाचे शास्त्र
- सेंद्रिय शेतीपद्धतीमध्ये तणांच्या व्यवस्थापनाबद्दलही अतिशय वेगळा दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे. शास्त्रज्ञांसह सर्वांचा असा दावा आहे की, तण हे पिकांच्या अन्नद्रव्यांशी स्पर्धा करत असल्याने ती समूळ नष्ट करावीत, शेत नेहमी तणविरहित व स्वच्छ असावे.
- सर्वसाधारणपणे कोणत्याही पिकांच्या सुरुवातीच्या एक ते दीड महिना कालावधीत तण अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश व ओलाव्यासाठी मुख्य पिकांशी स्पर्धा करतात. त्यानंतर तण कितीही वाढले तरी त्याचा उत्पन्नावर काहीही परिणाम होत नाही.
- तणाचे व्यवस्थापन करताना शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग केले आहेत व प्रत्येक पिकाचे आर्थिक नुकसान केव्हा होऊ शकते, हा कालावधी निश्चित केला आहे. या कालावधीत पिकांमध्ये तण नको. त्यानंतर तण कितीही वाढले तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होत नाही.
- बहुसंख्य तण अल्पायुषी व उथळ मुळ्यांचे असल्याने ते उंच असलेल्या व खोल मुळ्या असणाऱ्या पिकांशी अन्नद्रव्यासाठी अजिबात स्पर्धा करत नाहीत. आपणास हवी असलेली मूलद्रव्ये ती वातावरणातून खेचून घेतात. जमिनीतील ओलाव्याशी ते स्पर्धा करतात. रासायनिक खते वापरणे बंद केले की आपोआप तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, हा बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
तणांचे सेंद्रिय पद्धतीने नियंत्रण कसे करावे
- तणांचे निर्मूलन, नियंत्रण, समूळ उच्चाटन नष्ट करू नका. त्या ऐवजी त्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. तण उपटून न टाकता ती कापून आच्छादन म्हणून वापरा.
- तणांची उंची मुख्य पिकाच्या उंचीपेक्षा जास्त होणार नाही याची मात्र दक्षता घ्या. निसर्ग विशिष्ट प्रकारच्या तणांची वाढ, विशिष्ट काळातच, विशिष्ट (कमीअधिक) प्रमाणातच नियोजनपूर्वक करत असतो.
- नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी हे आवश्यक ठरते. जमिनीवरील विशिष्ट मूलद्रव्यांची कमतरता दूर करण्यासाठी विशिष्ट तणांची वाढ निसर्ग करत असतो. म्हणून शेतकऱ्यांना असा अनुभव आला आहे, की, एखाद्या वर्षी घोळ तणांचा तर एखाद्या वर्षी तरोटा, गोखरू, कॉग्रेस इत्यादी तणांचाच प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे जाणवते. घोळ तणामुळे जमिनीतील मॅग्नेशिअम धातूंची कमतरता दूर होते. मोहरीने जस्ताची तर राजगिरा पिकांमुळे लोहाची कमतरता भरून निघते.
- निसर्ग विशिष्ट किडींच्या आगमनाआधी विशिष्ट वनस्पती वाढवून प्रतिरोधकाची निर्मिती करतो. जमिनीत तणांच्या मुळ्यांद्वारे रसायने स्त्रवली जातात. त्यामुळे सूत्रकृमीसारख्या किडींना अटकाव होतो. उदाहरणार्थ, झेंडू. अशी अनेक उदाहरणे ज्ञात व अज्ञात आहेत. त्यामुळे असे वाटते की, मानवाने सरसकट तणांचे उच्चाटन न करता निसर्गाचे व तणांच्या निर्मितीमागचे प्रयोजन जाणून घ्यावे.
- काही तण त्रासदायक असतात. उदाहरणार्थ, हराळी, कुंदा, लव्हाळा (नागरमोथा). ज्या शेतात हरळीचा प्रादुर्भाव जास्त आहे, त्या शेतात राजगिरा पेरावा व तो दोन महिन्यांचा झाल्यावर कापून त्याचे आच्छादन हराळीवर टाका. एक-दोन वर्षांत केवळ आच्छादित जमिनीमुळे व राजगिऱ्यातील रासायनिक द्रव्यांमुळे हरळीचे प्रमाण खूप कमी होईल.
- लव्हाळा किंवा नागरमोथा तण जास्त असणाऱ्या शेताला पाणी दिल्याच्या दुसऱ्या दिवशी वाफसा येण्यापूर्वीच मजूर लावून ओल्या जमिनीती नागरमोथ्याच्या झाडांना बोटांच्या चिमटीत धरून मुळ्यासह – गड्ड्याह उपटून घ्या. त्यानंतर जमिनीवर लगेच उपलब्ध काडीकचरा/ बायोमासचे आच्छादन करावे.
- सूर्यप्रकाशा अभावी लव्हाळा वाढणार नाही. एक-दोन वर्षे असे केल्यास नागरमोथ्याचा त्रास कमी होतो.
- तण सूर्यशक्तीचा वापर करून आपली वाढ करून घेतात. तणांनी आपल्या शरीरात साठवलेली ही सूर्यशक्ती आणि ऊर्जा तण कापून, त्याचे आच्छादन करून जमिनीला परत केली तर त्या ऊर्जेचा वापर जमिनीतील सूक्ष्म जीवाणू करून घेतात व जमीन अधिक जिवंत व सकस बनण्यास मदत होते. त्यामुळे आपण पेरलेली पिके जोमाने वाढतात व भरपूर उत्पन्न देतात. त्यासाठी तणांचे योग्य व्यवस्थापन ही कला अधिक शेतकऱ्यांनी शिकावी.
तण व्यवस्थापनातील आर्थिक नुकसानीची पातळी
अ.क्र. | पीक | आर्थिक नुकसानीची पातळी (तणमुक्त दिवस) |
1 | ज्वारी | 14-45 |
2 | बाजरी | 15-30 |
3 | तूर | 20-60 |
4 | सूर्यफूल | 25-50 |
5 | सोयाबीन | 20-45 |
6 | भेंडी | 30-60 |
7 | मिरची | 40-60 |
8 | कोबी, फूल | 50-60 |
9 | वांगी | 30-40 |
10 | टोमॅटो | 30 |
11 | कांदा | 40 |
तणांचे जैविक व्यवस्थापन
जैविक उपायाद्वारे तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आज प्रयत्नशील आहेत. उदाहरणार्थ, नागफणी तणासाठी कोचीनल भुंगे, गाजर गवतासाठी मॅक्सिकन भुंगे, झायगोग्रॅमा, बायकोलोराटा, भुंगे, घाणेरी पाने खाणारे टिली ओनेमीन स्क्रू, भात खाचरातील तणांसाठी टाडपोल श्रीम्प (मासे) सोडतात. जलकुंभीसाठी निओचेटिंना इकोरिनी ब्रचो भुंगेरे सोडतात.
सेंद्रिय पद्धतीने तण नियंत्रणाचे फायदे
- मुख्य पिकांना परिपोषक मूलद्रव्ये पुरवतात.
- जमिनीवरील मातीचे सरंक्षण करतात.
- जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
- जमिनीत हवा खेळती ठेवण्यास मदत करतात.
- काही तण त्रासदायक तणांसाठी वाढरोधक म्हणून काम करतात.
- तण मेल्यानंतर मुंग्या, गांडुळे व जीवाणूंसाठी खाद्य म्हणून वापरले जाते.
विशेष बाब :
तणे पिकांसोबत अन्नद्रव्ये, ओलावा यासाठी स्पर्धा करतात. तणांचा वेळोवर बंदोबस्त नाही केल्यास उत्पादनात ३० टक्के पर्यंत घट येऊ शकते. शिवाय पीक उत्पादनाचा दर्जा व प्रत खालावते. परिणामी पीक उत्पादनावर याचा खूप प्रतिकूल परिणाम होतो. म्हणून सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये तणांचा बंदोबस्त करावयाचा झाल्यास वरील प्रमाणे तत्त्वाचा आधार घेऊन सेंद्रिय शेतीमधील तणांचे बंदोबस्त /निवारण आवश्यक असते.