‍शेतीपूरक व्यवसायात तरूणांना खूप संधी

महाराष्ट्रात शेतीव्यवसायात नव्याने मोठे बदल होत आहेत. या बदलामुळे शेतीचे उत्पन्न वाढण्यास चांगली मदत मिळत आहे. शेतकरी बांधव उपलब्ध भू-क्षेत्रावर अधिकाधिक उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने दर्जेदार कृषि निविष्ठा, पिकांची लागवड, खते व आधुनिक पद्धतीने पाणी व्यवस्थापन, काढणीपश्चात्त सुधारित तंत्रज्ञान यामुळे शेतीचे उत्पन्न वाढत आहे. त्याचबरोबर शेतीव्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर तरूण वर्ग वळत आहे, कारण शासकीय नोकरी मिळत नसल्याकारणाने व नोकरीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने स्पर्धा वाढत आहेत, शिवाय शासनाने नोकरी मिळण्यासंदर्भात जाचक अटी व शर्ती ठेवल्यामुळे सर्वसाधारण तरूणांना नोकरी मिळणे अशक्य झालेले आहे. यामुळेच “नोकरी नको पण हक्काची शेती असावी” अशी मानसिकता तयार झालेली आहे. म्हणून उपलब्ध जमिनीतून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व शासकीय योजनांचा लाभ मिळवून शेती करण्याकडे आजचा तरूण वर्ग आकर्षित होत आहे.

सध्याच्या आधुनिक युगात फक्त शेती करता येणार नाही, मात्र शेतीसोबत इतर पर्यायी व्यवसाय म्हणजेच शेळीपालन, कुक्कुटपालन, गाय-म्हैसपालन किंवा इतर फळे, भाजीपाला उत्पादन करून ‍ विक्री केल्यास त्यातून चांगले दर्जेदार व नगदी उत्पन्न शेतकऱ्यांना हमखास मिळू शकेल. यातून शेतकरी बांधवांची आर्थिक स्थिती उंचावले व त्यांचा विकास होण्यास मदत होईल.

प्रस्तुत ‍शेतीपूरक व्यवसायात तरूणांना खूप संधी या लेखामध्ये आपणास शेतीपूरक व्यवसाय म्हणजे काय व शेतीपूरक व्यवसायातील संधीचे स्वरूप स्पष्ट होईल. शेतीपूरक व्यवसाय कोणता करावा, शेतीपूरक व्यवसायाबद्दल जाणवणारे प्रश्न व त्यासंबंधी खुलासा मिळेल. त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसायातून होणारे फायदे यासंबंधी माहिती मिळू शकेल.

शेतीपूरक व्यवसाय म्हणजे काय ?

निसर्गाचे अवकृपेने किंवा इतर कोणत्याही कारणाने कोरडवाहू अथवा बागायत सिंचनाचे अंतर्गत असणाऱ्या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी नसल्याने, शेतकऱ्यांना इतर पर्यायी उत्पन्नाचे शाश्वत साधन असणाऱ्या व्यवसायास शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात.

कोणता शेतीपूरक व्यवसाय करावा ?

सध्याच्या काळात शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. सर्वसाधारण ग्रामीण भागात कुक्कुटपालन, शेळीपालन, गाय-म्हैसपालन हे प्रामुख्याने केले जातात. मात्र प्रक्रिया उद्योग व मत्स्यव्यवसाय करणारे शेतकरी कमी आहेत. यामध्ये सुद्धा चांगली संधी निर्माण झालेली आहे. या व्यवसायास देखील चांगली बाजारपेठ व हमीभाव असल्याने तो तरूणांना चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. गरज आहे फक्त शेती किवा शेतीशी निगडित व्यवसाय करण्याची.  

कोणत्याही शेतीपूरक व्यवसायास चांगले महत्त्व आहे ?

ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या व्यवसायापैकी रेशीम शेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, गाय-म्हैसपालन, मत्स्यव्यवसाय, फळे-भाजीपाला प्रक्रिया उद्योग, बीजोत्पादन कार्यक्रम, इ.

शेतीपूरक व्यवसायासाठी कोणत्या शासकीय योजना आहेत ?

महाराष्ट्र शासनाने अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ‍विविध प्रकारच्या योजना कार्यान्वित केल्या असून त्यापैकी पोकरा, अपेडा, नाबार्ड, पशुसंवर्धनच्या शेळी-मेंढीपालन, गाय-म्हैसपालन, कुक्कुटपालन इ. त्याचबरोबर राज्य व केंद्रपुरस्कृत विविध योजना आहेत.  

शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी शासकीय अनुदान मिळते का ?

महाराष्ट्र शासनाने अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करून लाभ देण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेमार्फत देण्यात येतो. मात्र सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीची असल्यामुळे फारशा शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीचा अभाव असल्याने लाभ मिळत नाही किंवा योजनेच्या लाभांपासून वंचित राहवे लागत आहे. मात्र शासकीय स्तरावरून सर्व योजनांचे अनुदान /लाभांश पर्याप्‍त स्‍वरुपात मिळत आहे.

शेतीपूरक व्यवसायासाठी जमीन किती लागेल ?

सर्वसाधारण किमान अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक जमीन असणारा शेतकरी चांगल्या प्रकारे शेतीपूरक व्यवसाय करू शकतो. मात्र जमीन किती असावी या प्रश्न इथे लागूच होत नाही.

कमीत कमी गुंतवणुकीत कोणता व्यवसाय करावा ?

व्यवसाय म्हटले की, गुंतवणुक आली यात काही शंका नाही, परंतु कमीत कमी गुंतवणुकीत आपणास व्यवसाय करावयाचा असल्यास शासकीय योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यावा कारण शासकीय योजनेत लाभार्थ्यांना चांगल्या अनुदान देण्यात येत आहे. उदा. कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन, पोकरा इ.

शेतीपूरक व्यवसायासाठी भाग-भांडवल कसे मिळेल ?

ग्रामीण भागात सर्वसाधारणपणे शेती व शेती व्यवसायास भाग-भांडवल किंवा कर्ज हे राष्ट्रीयकृत बँक, खाजगी वित्तीय संस्था किंवा इतर मार्गाने मिळविता येते. मात्र खाजगी वित्तीय संस्थेचे व्याज दर अधिक असल्याने ते आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना शक्य होत नाही. म्हणून राष्ट्रीय किंवा जिल्हा बँकेकडून अल्प किंवा दीर्घ मुदतीत कर्ज घ्यावे.

शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण कोठे घ्यावे ?

संबंधित पशुसंवर्धन विभागामार्फत वेळोवेळी प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम राबविले जातात. त्यामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र सुद्धा वितरित केले जातात. याचा लाभ त्यांना शासकीय योजनेत होतो. तसेच  जिल्हा व तालुका स्तरावर संबंधित यंत्रणेमार्फत शेती व्यवसायासंबंधी प्रशिक्षण देण्यात येते.

शेतीपूरक व्यवसायाचे फायदे ?

  • स्थानिक ठिकाणी रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होईल.
  • नोकरी किंवा व्यवसायानिमित्त शहराकडील स्थलांतराचे प्रमाण कमी होईल.
  • शेतीपूरक व्यवसायामुळे ग्रामीण तरूणांना नगदी स्वरूपात उत्पन्न मिळू शकेल.
  • वाढती बेकारी व बेरोजगारीचे प्रमाण काही प्रमाणात कमी करता येईल.
  • शेतीपूरक व्यवसायाने तरूणांचा आर्थिक उत्पन्न वाढेल.
  • शेतीत तयार होणाऱ्या कच्च्या मालाची किंमत वाढण्यास मदत होईल.
  • कच्च्या मालापासून प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करता येतील.
  • ग्रामीण महिलांना शेतीपूरक व्यवसायामुळे नियमितपणे काम ‍मिळू शकेल.
  • तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीपूरक व्यवसायातून दर्जेदार उत्पादन घेता येईल.

विशेष बाब :

महाराष्ट्रातील तरूणांची वाढती बेकारी व बेरोजगारी लक्षात घेता तरूणांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. तरूणाच्या हाती काम मिळाल्यास बेकारी व बेरोजगारी कमी होईल. त्यातून तरूण शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकेल. त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसास करण्यासाठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याची व्यवस्था संबंधित यंत्रणेमार्फत होते. शिवाय विविध कृषीपूरक योजनांची तरतुद शासनाने केलेली आहे त्यांचा लाभ घेणे आवश्यक आहे. मात्र तरूणांनी एकच व्यवसायावर अवंबून न राहता इतर बहुपर्यायी व्यवसाय करणे नितांत गरजेचे आहे. ज्यामुळे बेकारी व बेरोजगारी कमी होईल व तरूणांना शेतीपूरक व्यवसाय वाढविण्यास व करण्यास खऱ्या अर्थाने चांगली दिशा मिळेल.

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

Prajwal Digital

Leave a Reply