महाराष्ट्रातील बहुतांशी शेती पर्जन्यमानावर अवलंबून आहे. हवामानातील वाढते प्रतिकूल वा अनुकूल बदल यामुळे सतत हवामानात बदल होऊन याचा वाईट परिणाम शेतातील पीक उत्पादनावर होत आलेला आहे. अशा परिस्थितीत शेतीसाठी हवामानाचा अंदाज घेऊन अचूक नियोजन करणे शेतकरी बांधव कठीण जात आहे. परिणामी अवकाळी पाऊस, ओला अथवा कोरड दुष्काळ यामुळे शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सदर नुकसान पातळी कमी करण्यासाठी अथवा टाळण्यासाठी मानवी जीवन व पीक उत्पादनासाठी कृषि हवामान हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे.
वाचा : एक्सप्रेस मान्सून महाराष्ट्राकडे रवाना
हवामान म्हणजे काय ?
- आपल्या भोवतीच्या वातावरणाचा एकत्रित परिणाम म्हणजे हवामान होय.
- हवामान (Weather) ह्या अर्थी वापरण्यात येणाऱ्या हवामान हा शब्द ” वातावरणाची सद्य स्थिती” दर्शवितो. तर हवामान (Climate) ह्या अर्थी वापरण्यात येणारा हवामान हा शब्द “वातावरणाची किमान ३० दिवस असलेली सरासरी स्थिती” दर्शवितो.
- वातावरण म्हणजे, पृथ्वीच्या भोवती असणारे रंगहीन, गंधहीन, चवहीन वायूचे आवरण होय. एखाद्या प्रदेशाच्या हवामानाचा अभ्यास करावयाचा झाल्यास, त्या प्रदेशाचा ३२ ते ३५ वर्ष तेथील प्रदेशाचे निरीक्षण करावे लागते.
कृषि हवामान का महत्त्वाचे
- अलीकडच्या काळात सर्वसाधारणपणे सामाजिक, व्यावसायिक व औद्योगिक यासारख्या घटकांवर हवामानातील बाबींचा परिणाम होतच आलेला. त्यामुळे हवामानशास्त्रास मानवी जीवनात अनन्यासाधारण महत्त्व आहे.
- हवामानातील घटकांचा नौकाविहार, विमानाचे उड्डाण, वाहतूक व्यवस्था यांसारख्या रोजच्या जीवनातील विविध बाबींवरही परिणाम झालेला आढळतो, परंतु हवामानाचा सर्वात मोठा परिणाम कृषि क्षेत्रावर होतो.
- शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि-हवामानशास्त्र विभाग हा स्वतंत्र विभाग निर्माण झाला. याचे मुख्यालय पुणे येथे आहे. यात पिके व हवामानाच्या परस्परसंबंधाचा अभ्यास करण्यात येतो. कृषि-हवामानशास्त्रात प्रामुख्याने हवामान, जमीन, पाणी व पिके यांचा सहसंबंध कसा आहे याचा शोध घेण्यात येतो.
- कृषि हवामानशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्याला स्थिर व शाश्वत कृषि उत्पादनासाठी करता येईल. त्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता आहे.
- सूर्यप्रकाश, तापमान, पाऊस, वारा, आर्द्रता यांसारख्या हवामानातील घटकांचा पीक-उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे या सर्व बाबींचा अभ्यास विभागावर करून प्रत्येक विभागातील वेगवेगळ्या पिकांचा कालावधी ठरविणे आवश्यक आहे.
- पावसाची सुरुवात कधी होते, पावसाचा खंड कधी पडतो, पडणारा पाऊस हा किती व काय तीव्रतेने पडतो, पाऊस पडण्याची शक्यता कधी व किती आहे याचा अंदाज करण्यासाठी मागील 25 ते 30 वर्षांच्या पावसाचे विश्लेषण त्या त्या विभागात करणे आवश्यक आहे.
- पावसात खंड नेमका कधी पडतो, पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कधी आहे याचीही माहिती आपणास हवी.
वाचा : मान्सूनचे केरळमध्ये आगमन, पण कधी पडणार पाऊस
कृषी हवामानाचा परिणाम कसा होतो
- हवामानानुसार सर्व सजीवांवर खूप मोठा परिणाम होतो. याच हवामानाचा पीक उत्पादनावर देखील परिणाम होतो.
- हवामानातील बदल मनुष्याच्या हातात नसल्याने त्यातील बदलांवर मात करणे अशक्य असते. अशावेळी ठराविक ठिकाणच्या अनेक वर्षांच्या हवामानाचा अभ्यास करून पुढील अंदाज बांधता येतात व त्यावरून माणूस त्याच्या आराखडयात आवश्यक ते बदल घडवू शकतो.
- आपल्या जीवनात हवामानाचा सर्वात जास्त परिणाम कृषि उत्पादनावर होतो याचे कारण म्हणजे वनस्पती संपूर्ण 24 तास वातावरणाच्या किंवा हवामानाच्या संपर्कात असते. म्हणूनच कृषि क्षेत्राच्या बाबतीत हवामानाचे अंदाज बांधणे ही अत्यावश्यक बाब बनते.
- हवामान अंदाजानुसार आपणास अनुकूल वा प्रतिकूल परिस्थितीस तोंड देणे शक्य होते.
- एकंदरीत विचार केल्यास हवामानाचा कृषि व कृषि उत्पादनावर खूप मोठा परिणाम होत असल्याचे आढळून येते.
पीक उत्पादनात कृषि हवामान का महत्त्वाचे हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करावे.
– किशोर ससाणे, लातूर