चवळीचे वाण कोणते वापरावे, उत्पन्न वाढेल का ?

चवळी हे एक महत्त्वाचे शेंगवर्गीय पीक आहे. चवळीचे उगमस्थान दक्षिण आफ्रिका असे मानले जाते. चवळी हे एक प्रकारचे द्विदल धान्य आहे. चवळीचे दाणे मध्यम आकाराचे असतात. चवळीचा उपयोग धान्य म्हणून व जनावरांसाठी पर्यायी चारा म्हणून केला जातो. यामुळे चवळीचे दुहेरी महत्त्व आहे. यामुळे चवळीचे दर्जेदार उत्पादन घेणे आवश्यक आहे. यासाठी चवळीच्या अधिक उत्पादन देणारे व कमी दिवसात तयार होणारे बियाणे पेरणीसाठी वापरणे आवश्यक आहे.

ICAR द्वारा चवळीचे शिफारस केलेले वाण

देशात चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने कमी पर्जन्यमान व दुष्काळी परिस्थिती तग धरून, उत्पादन अधिक देणारे वाण भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली (ICAR) यांनी शिफारस केले असून अलीकडच्या काळात या वाणांचा वापर केल्याने चारा उत्पादनात व धान्य उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली आहे, अशा वाणाची माहिती खालील प्रमाणे आहे.

1) पुसा फाल्गुनी (Pusa Falguni)

पुसा फाल्गुनी ही चवळीची जात उन्हाळी हंगाम (फेब्रुवारी – मार्च) दरम्यान पेरणीसाठी वाणाची शिफारस भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली (ICAR) यांनी करण्यात आला आहे. प्रत्येक झाडाला 12-15 फांद्या येतात आणि साधारणत: एका झाडाला 133 शेंगा लागतात. उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी उपयुक्त वाण आहे.

2) पुसा बरसाती (Pusa Barsati)

पुसा बरसाती ही लवकर येणारी जात असून खरीप हंगामासाठी या जातीची शिफारस भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली (ICAR) यांनी केलेली आहे. या जातीच्या शेंगा पिवळट हिरव्या रंगाच्या आणि 25 ते 27 सेंटिमीटर लांब असतात. खरीप हंगामातील लागवडीसाठी उपयुक्त वाण आहे.

3) पुसा दो-फसली (Pusa do-phasali)

पुसा फाल्गुनी आणि फिलीपीन्समधील लांब शेंगाच्या वाणाच्या संकरातून भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली (ICAR) यांनी विकसित केला आहे. हा वाण उन्हाळी आणि खरीप हंगामातील लागवडीसाठी योग्य आहे. या जातीची झाडे, झुडपी, बुटकी असून शेंगा 18 सेंटिमीटर लांब, सरळ आणि हिरव्या रंगाच्या असतात. बी लावल्यानंतर 35-40 दिवसांत या जातीला फुले येतात. या जातीचे जवळजवळ 10 तोडे मिळतात आणि त्यापासून दर हेक्टरी 10 टन उत्पादन मिळते.

4) पुसा ऋतुराज (Pusa Rituraj)

हा दोन्ही हंगामांत घेण्यास योग्य वाण आहे. ही जात झुडूप वजा वाढणारी असून या जातीची फुले जांभळ्या रंगाची असतात. या वाणामध्ये पेरणीनंतर उन्हाळी हंगामात 40 – 45 दिवसांनी आणि खरीप हंगामात 30 दिवसांनी शेंगा काढणीला येतात. या जातीची झाडे बुटकी असून भरपूर शेंगा येतात. या जातीच्या शेंगा 22-25 सेंटिमीटर लांब, कमी तंतुमय आणि हिरव्या रंगाच्या असतात. एकूण 8 ते 10 तोडण्या मिळतात. या जातीचे हेक्टरी उत्पादन 8-8.5 टनांपर्यंत मिळते. बी भुरकट रंगाचे असून शेंगा आणि बी या दोन्हींसाठी लागवड करण्यात येते.

5) पुसा कोमल (Pusa Komal)

हा जिवाणूमुळे होणाऱ्या करपा रोगाला प्रतिबंधक वाण असून पुसा दो फसलीच्या मानाने लवकर तयार होणारा लांब शेंगांचा, अधिक उत्पादन देणारा आहे. खरीप आणि उन्हाळी दोन्ही हंगामांत घेण्यास योग्य, 45 दिवसांत फुले यायला सुरुवात होते.

महाराष्ट्रासाठी चवळीचे वाण

वाणाचे नावकालावधी (दिवस)उत्पादन (क्विंटल./हे.)वैशिष्‍ट्ये
कोकण सदाबहार60-6512-15लवकर तयार होणारा वाण, वर्षभर लागवडीसाठी योग्‍य, मध्‍यम आकाराचे दाणे
कोकण सफेद70-7514-16टपोरे सफेद दाणे
फुले पंढरी70-7514-16तांबूस, मध्‍यम दाणे

अशाप्रकारे चवळी पिकाच्या विविध वाणांची माहिती आपण जाणून घेतली आहे. चवळी पासून दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी पुसा फाल्गुनी, पुसा बरसाती,पुसा ऋतुराज, फुले पंढरी अशाउपयुक्त वाणाचा वापर करावा, कारण सदर वाण अधिक उत्पन्न व रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देणारे आहेत. यामुळे शेतकरी बांधवांनी चवळी चारा पिकांच्या योग्य वाणाची निवड लागवडीसाठी करण्यात यावी.

चवळीच्या सुधारित वाणाचे फायदे :

  • कमी पर्जन्यमान व अवर्षणग्रस्त पिकांची वाढ चांगली होईल.
  • चवळीच्या धान्य व चारा उत्पादनात लक्षणीय वाढ होईल.
  • चांगल्या व दर्जेदार गुणवत्तेचे बियाणे तयार होतील.

अशा आहे की, चवळीच्या सुधारित वाणाविषयी दिलेली माहिती शेतकरी बांधवांनी उपयुक्त ठरणार आहे. तसेच त्यांचे उत्पादन स्तर वाढविण्यास चांगली मदत होईल, शिवाय योग्य वाणाची निवड केल्याने त्यांना दर्जेदार उत्पादन घेता येईल.

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

Prajwal Digital

Leave a Reply