तीळ हे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. तीळाची लागवड कशी करावी ? या लेखामध्ये आपणास तिळाचे वाण कोणते वापरावे, लागवड करण्याची पद्धत याविषयी माहिती मिळणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून तीळाचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यास मदत मिळेल. शास्त्रोक्त पद्धतीने तीळाचे उत्पादन घेतल्यास चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते.
हवामान कसे असावे ?
तीळ पिकास उष्ण व समशीतोष्ण व जास्त पाऊसमान असणाऱ्या प्रदेशात हे पीक चांगले येते. परंतु हवेत आर्द्र व सतत पाऊस या पिकास फारसा मानवत नाही. सर्वसाधारण ७०० ते १००० मी.मी. पाऊस या पिकास उत्तम राहतो.
जमीन कोणती निवडावी ?
महाराष्ट्रात तीळ पिकास मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. चोपण व क्षारयुक्त व खरबाड जमिनीत तीळ पीक घेऊ नये.
पूर्व मशागत कशी करावी ?
सुरूवीस खरीपात पेरणी करावयाची असल्यास उन्हळ्यात एक खोलवर ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करून घ्यावी. त्यानंतर बैलचलित २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देवून जमीन भुसभुशीत करावी. त्यानंतर जमीन सपाट करावी घ्यावी. ज्यामुळे पेरणी चांगली होवून बियाणे उगवणक्षमता चांगली होईल.
बियाणे किती वापरावे ?
पेरणीसाठी प्रती हेक्टरी सर्वसाधारणपणे २.५ ते ३ किलो (एकरी १ किलो) बियाणे वापरावे.
बीजप्रक्रिया कशी करावी ?
बियाण्यापासून व जमिनीमधून उद्भवणारे बुरशीजन्य रोग होवू नये म्हणून ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर जिवाणू संवर्धनाची म्हणजेच २५ ग्रॅम अँझोटोबॅक्टर प्रति किलो बियाणे या प्रमाणात लावावे.
पेरणीची वेळ कोणती ?
तीळाची खरीप हंगामात पेरणी करावयाची असल्यास साधारणपणे १५ जून ते २० जुलै या महिन्यात परतीचा पाऊस झाल्यावर जमिनीत पुरेशा ओलावा झाल्यावर, जमिनीत योग्य वाफसा झाल्यावर पेरणी करावी.
पेरणीचे आंतर किती ठेवावे ?
तीळ पिकासाठी ४५ सें.मी.x१० सें.मी. किंवा ३० सें.मी. x १५ सें.मी. अंतरावर अनुक्रमे ४५ सें.मी. किंवा ३० सें.मी. अंतराच्या पाभरीने पेरणी करावी. तिळाची तिफीन किंवा पाभरीने पेरणी करावी बियाण्यात बारीक वाळू अथवा चाळून घेतलेले शेणखत मिसळावे. त्यामुळे बियाण्याचे वितरण योग्य प्रमाणशीर होते. पेरणी २.५ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर करू नये.
आंतर पिके कोणते घ्यावे ?
तीळ पिकांत शक्यतो आंतर पीक घेत नाहीत आवश्यकतेनुसार तीळ + तुर असे आंतरपिक काही प्रमाणात घेतले जाते.
चर कसे काढावे ?
भारी जमिनीत १२ ओळीनंतर (बी झाकण्यापूर्वी) दोन ओळींच्यामध्ये (फटीत) बळीराम नांगराचे सहाय्याने चर काढावेत. पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत चांगले मुरेल. अतिरिक्त पाणी बाहेर निघून जाण्यास मदत होईल. मुरलेल्या पाण्याचा पावसाच्या ताणाचे वेळी पिकास फायदा होतो. अधिक उत्पादनासाठी २ टक्के युरीयाची फवारणी पिक फुलोऱ्यात आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत असतांना करावी.
विरळणी कशी करावी ?
तीळ पिकाच्या पेरणीनंतर तीन आठवड्यांच्या आत विरळणी करावी. ३० सें.मी. अंतराच्या पाभरीने पेरणी केली असल्यास दोन रोपांतील अंतर १५ सें.मी. किंवा ४५ सें.मी. अंतराच्या पाभरीने पेरणी केली असल्यास दोन रोपातील अंतर १० सें.मी. राहील अशा बेताने विरळणी करावी जेणे करून रोपांची संख्या हेक्टरी २.२२ लाख राहील.
खताचा वापर कसा करावा ?
पूर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी १० ते १२ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळावे किंवा हेक्टरी एक टन (एकरी ४ क्विंटल) एरंडी किंवा निंबोळी पेंड पेरणी बरोबर द्यावी. आधिक २५ किलो नत्र प्रति हेक्टर पेरणीच्या वेळी व २५ किलो नत्र प्रति हेक्टर पेरणीनंतर तीन आठवड्यांनी पेरून द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीत कमतरता असल्यास पेरणीच्यावेळी२० किलो गंधक प्रति हेक्टरी द्यावे.
आंतरमशागत कशी करावी ?
तीळाची रोप अवस्थेत पीक हळू वाढत असल्याने तणाबरोबर अन्नद्रव्य व ओलाव्यासाठी स्पर्धा करू शकत नसल्याने पेरणीनंतर ३० दिवसांनी दोन खुरपणी /निंदणी व कोळपणी करावी.
पीक संरक्षण कसे करावे ?
तीळावर खूप प्रमाणात कीड व रोगांचा प्रादुर्भाव होतो. सामान्यपणे पाने गुंडाळणारी अळी / तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५% ई.सी. २० मिली किंवा ४० ग्रॅम, ५०% कार्बारील पावडर ४० ग्रॅ प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काढणी कशी करावी ?
साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९५ दिवसात पीक काढणीस येते. काढणी लवकर केल्यास बोंडातील तीळ पोचट व बारीक राहून उत्पादनात घट येते, काढणी उशिरा केल्यास बोंडे फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी.
उत्पादन किती मिळते ?
तीळ पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास प्रती हेक्टरी ८ ते १० क्विंटल उत्पन्न मिळू शकते.
तीळाची लागवड कशी करावी ? हा लेख आपणास आवडल्यास असल्यास, जास्तीत जास्त समूहापर्यंत करून सहकार्य करावे व ब्लॉगला सब्स्क्राईब करून बहूल्य मदत करावी.