जमीन वर्गीकरण, गुणधर्म व प्रकार

जमीन ही राष्ट्राची खूप महत्त्वाची नैसर्गिक संपत्ती आहे. या संपत्तीचे उत्तम प्रकारे जतन केले पाहिजे. लोकांचे जीवन हे सर्वस्वी जमिनीवरच अवलंबून असते. अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्रत्येक माणसाच्या आवश्यक गरजा जमिनीच्या माध्यमातूनच पुरविल्या जातात. वनस्पतीची वाढ, अन्नधान्याची निर्मिती आणि कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल निर्मिती करण्यासाठी मातीचा पर्यायाने जमिनीचा फारच उपयोग होतो.
माती ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे. शेतीतील माती ही झिजलेल्या खडकाचा निव्वळ चुरा नसून सजीव आणि क्रियाशील आहे, त्यामुळेच जमिनीवर वनस्पती वाढू शकतात, अन्नधान्ये आणि चारानिर्मिती करतात. म्हणूनच शेतीमध्ये जमीन या घटकास अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
जमिनीच्या व्याख्या :
“जनक खडकावरील निरंतर प्रक्रियांच्या विकासाच्या किंवा उत्क्रांतीच्या परिपाकास जमीन असे म्हणतात.” 
“मूळ खडकांचे विदारण होते, त्यामध्ये सेंद्रिय द्रव्ये मिसळली जातात, मृदांच्या कणांमध्ये असणाऱ्या पोकळीत वायू असतो व काही प्रमाणात पाण्याचाही अशं असतो, अशा संयुक्त घटकांनी निर्माण होणाऱ्या पदार्थास जमीन असे म्हणतात.”
महाराष्‍ट्रातील कृषि हवामानानुसार जमिनींचे वर्गीकरण
डॉ. बांगर (1984) यांनी महाराष्‍ट्राचा मातीदर्शक नकाशा तयार केला आहे. या नकाशात कृषि हवामानानुसार महाराष्‍ट्राच्‍या जमिनी आठ प्रकारांत विभागल्‍या आहेत.
1)   उथळ काळी जमीन
2)   मध्‍यम काळी जमीन
3)   भारी काळी जमीन
4) समुद्राकाठच्‍या गाळाची जमीन (कोस्‍टल अल्‍युव्हियल)
5) जांभ्‍या खडकापासूनची तांबडी व लाल माती (लॅटेराईट, लॅटेराईटिक)
6)   क्षारयुक्‍त विम्‍ल जमीन (सलाईन अल्‍कली)
7)   एकत्रित लाल काळी जमीन (मिक्‍स रेड ब्‍लॅक)
8)   लाल गाळाची व पिवळी जमीन
महाराष्‍ट्रातील जमिनींचे गुणधर्म :
1) उथळ, मध्‍यम आणि भारी काळ्या जमिनी
दक्‍खनच्‍या काळ्या कातळापासून (बेसॉल्‍ट) बनलेल्‍या मध्‍यम काळ्या जमिनी महाराष्‍ट्राचा जवळजवळ 60 ते 65 टक्‍के भाग व्‍यापलेला आहे. या जमिनी रंगाने काळ्या असतात. मात्र उंचावरील पहाडी भागात आणि उतरणीवर असलेल्‍या जमिनीच्‍या मातीचा रंग जरा फिका असतो. तेथे मातीचा थर कमी खोलीचा (उथळ) असतो व तो निकस असतो. सखल खोऱ्यातील खोलदरीच्‍या भागात अधिक काळी व चिवट माती आढळते. घाटाच्‍या अवतीभोवतीच्‍या जमिनी बऱ्याच बरड असून त्‍यात खड्यांचे प्रमाण जास्‍त असते. तापी, नर्मदा, गोदावरी व कृष्‍णा या नद्यांच्‍या खोऱ्यातील जमिनी रंगाने काळ्या असून खोली 6 मीटरपर्यंत असते. काही ठिकाणी खोल माती तर काही ठिकाणी वरचा मातीचा थर उथळ असतो. या जमिनींची खोली 90 ते 120 सेंटीमीटर किंवा त्‍यापेक्षा जास्‍त असते. या जमिनीतील माती जड असून, ती विम्‍लधर्मीय असतो. तिच्‍या अंगी पाणी शोषून धरण्‍याची शक्‍ती जास्‍त असते. म्‍हणून अशा जमिनीतून जास्‍त पाणी झिरपून जात नाही. अशा जमिनीत नत्र कमी, स्‍फुरद कमी ते मध्‍यम आणि पालाशाचे प्रमाण पुरेसे असते. सेंद्रिय द्रव्‍ये कमी प्रमाणात असतात. रूक्ष हवामानात बनलेल्‍या जमिनीतून कमी पावसामूळे क्षारांची धूप कमी होते. त्‍यामुळे ह्या जमिनीत भरपूर चुनखडी व इतर क्षार असतात. उपथरात चुनखडीचा अलग थरसुद्धा स्‍पष्‍ट दिसतो. लोहाचे प्रमाणसुद्धा जास्‍त आढळते. कॅल्शियम व मॅग्रेशियम यांचे प्रमाण जास्‍त असलेल्‍या जमिनी जास्‍त पाणी धरून ठेवतात. ओल्‍या झाल्‍या म्‍हणजे फार चिकण बनतात. वाळल्यावर फार आकसतात. त्‍यामुळे जमिनीस खोल भेगा पडतात.
2) समुद्राकाठच्‍या गाळाच्‍या जमिनी (कोस्‍टल अल्‍युव्हियल)
समुद्रकाठच्‍या भागात ह्या प्रकारच्‍या जमिनी आढळतात. या जमिनी ट्रॅप खडकापासून तयार झालेल्‍या असून बऱ्याच खोल वालुकामय मृदा असून त्‍यात चिकण मातीचे प्रमाण बरेच कमी असते. वालुकामय क्षेत्राच्‍या काही भागांत चोपण जमिनी आढळतात. या जमिनीत इलाईट या खनिजाचे प्रमाण जास्‍त असते. त्‍या सुपीक असतात आणि त्‍यांचा सामू 7 ते 8 पर्यंत असतो.
3) जांभ्‍या खडकाच्‍या जमिनी व तांबड्या जमिनी (लॅटेराईट आणि लॅटेराईटिक)
तांबडी माती हा लॅटेराईट या जांभ्‍या खडकापासून बनली आहे. त्‍या खडकात लोह, अल्‍युमिनियम यांचे प्रमाण जास्‍त असते. मात्र चुना अजिबात नसतो. त्‍या आम्‍लयुक्‍त असतात. जांभ्‍या खडकाचे शिलाचूर्णन (वेदरिंग) होऊन तांबडी माती बनली आहे. लोहाच्‍या अधिक प्रमाणामुळे जमिनीचा रंग तांबडा होतो. पठारावरील जमीन कमी सुपीक, उथळ, खडे-गोटे असलेली आणि फिक्‍कट रंगाची असते. सपाटीवरील किंवा मैदानावरील जमिनी अधिक सुपीक, खोल, गर्द रंगाच्‍या असतात. त्‍यात सेंद्रिय पदार्थांचा भाग जास्‍त असतो. त्‍यात केओलिनाईट या खनिजाचे प्रमाण जास्‍त असते. रत्‍नागिरी, सातारा, सांगली, कोल्‍हापूर, नाशिक आणि पुणे जिल्‍ह्याच्‍या पश्चिम भागात या जमिनींचे प्रमाण जास्‍त आहे. भाताची जमीन, बागेची जमीन आणि वरकस जमीन असे या जमिनीचे प्रकार पडतात.           
जमिनीचे प्रकार (Soil types) 
1) काळी किंवा रेगूर मृदा (Black of Regur Soil)
या मृदेने दख्खनच्या पठारावरील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे. तिला कापसाची काळी मृदा असे म्हणतात. सह्राद्री पर्वत रांगाच्या पूर्वेस एक सलग काळ्या मृदेचा प्रदेश पूर्व विदर्भातील भंडारा-चंद्रपूर जिल्ह्रापर्यंत पसरलेला आहे. हा सर्व प्रदेश ज्वालामुखी निर्मिती बेसॉल्ट, ट्रॅप खडकापासून अस्तित्वात आला आहे. जनक खडकाच्या विदाराणापासून चिकणमातीचे प्रमाण अधिक असलेली रेगूर किंवा कापसाची काळी मृदा निर्माण झाली आहे. या मृदेत वाळू द्राव, अल्युमिनियम कार्बेनेट, कॅल्शियम कार्बेनेटही पुरेसे आहे. पण काळसर रंग “टिटॅनियमया घटक द्रव्यामुळे आला आहे. या मृदेत सेंद्रिय द्रव्य (ह्रुमसचे) प्रमाण कमी आहे.
ही मृदा स्थानिक जनन खडकापासून निर्माण झाली असून फक्त मोठ्या नद्यांच्या खोऱ्यात ती डोंगर उतारावरून वाहून आणली गेली आहे. या मृदेत चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे. ही मृदा मोठ्या प्रमाणावर पाणी धारण करते. त्यामुळे थोड्याशा पावसावर कापसाची वाढ व्यवस्थित होते. या तिच्या गुणधर्मामुळे कापसाची काळी मृदा म्हणून ओळखली जाते. या मृदेचे तीन उपप्रकार पडतात.
·        खोल रेगूर मृदा (Deep Regur Soil)
·      मध्यम खोल रेगूर मृदा (Medium Deep Regur Soil)                            
·       उथळ रेगूर मृदा (Shallow Regur Soil)                   
2) जांभा मृदा (Laterite Soil)
महाराष्ट्रामध्ये दक्षिण भागात कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग व रागयड, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्रात आणि सह्राद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्रात या प्रकारची मृदा वितरित झाली आहे.
कोकणातील व सह्राद्रीच्या माथ्यावरील ही मूळ मृदा बेसाल्ट खडकाची परंतु या प्रदेशात प्रतिवर्षी 200 सें.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान पडतो. खडकातील बरीचशी द्रव्ये उतारावरून आणि जमिनीत पाझरून नाहिशी होतात. हैड्रेशनमुळे वाळू व चिकण माती तयार होते. ऑक्सिडेशन क्रियेमुळे लोह संयुगे तांबूस रंगाची होतात. मूळ लॅटेराईट खडक विटेसारखा खडबडीत असतो. त्याच्या विभाजनापासून लालसर रंगाची ही मृदा तयार होते. यात आरांश अल्प असून फक्त विद्राव्य-द्रव्य असते. ही मृदा फळबागांच्या लागवडीसाठी महत्त्वाचा आहे. उदा. हापूस आंबा, काजू व चिक्कू इत्यादी.   
3) तांबडी आणि पिवळसर मृदा (Red is Brown Soil)
या प्रकारच्या मृदेचे महाराष्ट्रात वितरण मर्यादित प्रदेशात झालेले आहे. ती उत्तर कोकणातील उंच प्रदेशात व लगतच्या सह्राद्रीवर आणि पूर्व विदर्भातील वर्धा वैनगंगा खोऱ्यात आढळणाऱ्या ग्रेनाईट, नीस इत्यादी “आर्कियनखडकावर, विंध्य व कडाप्पा खडकावर रासायनिक विदारण होऊन तांबडी आणि पिवळसर मृदा निर्माण होते. यात कॅल्शियमचे प्रमाण अल्प असते. या पिवळ्या रंगाच्या मृदा वाळू मिश्रीत लोम आढळते. ही मृदा सच्छिद्र व मध्यम जाडीची असल्याने मध्यम पर्जन्याच्या भागात पिके घेत नाहीत. लोम मृदा सखल भागात आढळतात. तेथे पाणी पुरवठ्याची सोय असल्याने तांदळाचे चांगले पीक घेतले जाते. अधिक उंचीवरील मृदा मात्र भरड कणाची असल्याने बाजरी सारखी भरडधान्ये काढतात.
4) गाळाची मृदा (Old Alluvial Soil)
सातपुडा आणि सातमाळा अजिंठा यांच्या दरम्यान असलेले तापी, पूर्णा खोरे खचदरीच्या भाग असावे. तापी-पूर्णा व त्यांच्या उपनद्यांनी वाहून आणलेला गाळ पूर्वीपासून या 300 मीटरहून कमी उंचीच्या खोलगट भागात एक सारखा साचून गोळाची मृदा निर्माण झाली आहे. या मृदेची सुपीकता जास्त आहे. त्यामुळे या खोऱ्यात ऊस, कापूस, केळी, गळीतधान्ये आणि अन्नधान्ये इत्यादींचे उत्पादन घेतले जाते. धुळे, जळगाव जिल्ह्राशिवाय बुलढाणा व अकोल्याच्या पूर्णा नदीच्या खोऱ्यात ही मृदा आढळते.
5) क्षारयुक्त व आम्लारी मृदा (Saline & Alkaline Soil)
ही मृदा प्रामुख्याने तीन विभागात आहे. अ) कमी पावसाचे कोरडे प्रदेश, ब) किनाऱ्यालगतचे भरतीच्या प्रभावाखालील प्रदेश, क) अतिसिंचित प्रदेश या मृदेच्या पृष्ठभागावर पांढरट रंगाचे क्षार जमा झालेले दिसतात. ज्या मृदेत विद्राव्य क्षारांचे प्रमाण 0.5 टक्के पेक्षा जास्त असते त्या मृदेला क्षारयुक्त मृदा असे म्हणतात. ज्या मृदेत विद्राव्य क्षारांचे प्रमाण 0.2 टक्के अथवा कमी असते. त्या मृदेला आम्लारी मृदा असे म्हणतात. 
महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्रात खेड्याच्‍या मुखालगतच्या प्रदेशात क्षारयुक्त अथवा खार मृदा आहेत. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्रात अति जलसिंचन केल्यामुळे मृदांच्या खालच्या थरातील क्षार केषा-कर्षणाने पृष्ठभागावर आले असून त्यांचा पांढरा थर काळ्या मृदेवर पसरलेला दिसतो. या मृदांना मीठ फुटी किंवा चोपण मृदा असे म्हणतात. अशा प्रकारच्या मृदा पीक लागवडीखाली आणणे अतिशय कठीण व खर्चाचे असते.
अशाप्रकारे प्रस्तुत लेखात महाराष्ट्रातील जमिनीचे वर्गीकरण, त्यांचे गुणधर्म व प्रकार याचा थोडक्यात अभ्यास केला आहे. जमिनीचे प्रकारानुसार निरनिराळे गुणधर्म आहेत ते पीक लागवडीसाठी काही ठिकाणी सुपीक (योग्य)व काही ठिकाणी नापीक (अयोग्य) असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे प्रकारानुसार त्या जमिनीत पिकांची लागवड केली जाते. या लेखाचा उद्देश फक्त आपणास जमिनीबाबत माहिती प्राप्त व्हावी हा आहे.  
संदर्भ :
  1. पीक उत्‍पादनाची मूलतत्‍त्‍वे आणि कार्यपद्धती : पाठ्यपुस्तिका-1, य.च.म.मु.वि.,नाशिक
  2. कदम रामप्रसाद हणमंत (2020) : जमिनीचे प्रकार, गुणधर्म व माती परीक्षण पद्धतीचा अभ्‍यास, अप्रकाशित कृषि विज्ञान पदवी प्रकल्प, य.च.म.मु.वि., नाशिक
  3. पीक उत्‍पादनाची मूलतत्‍त्‍वे आणि कार्यपद्धती : पाठ्यपुस्तिका- 2, य.च.म.मु.वि., नाशिक
  4. कृषि पणन मित्र (जानेवारी 2014/18), माती परीक्षण, महत्व, पद्धत आणि उद्देश, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

जमीन : वर्गीकरण, गुणधर्म व प्रकार हा लेख आपणास आवडला असल्यास  Subscribe, लाईककंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल. 

Prajwal Digital

1 thought on “जमीन वर्गीकरण, गुणधर्म व प्रकार”

Leave a Reply